अहमदनगरमध्ये माजी मंत्री व अंबाजोगाईत पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू; दिल्लीत खासदाराची आत्महत्या

अहमदनगर/अंबाजोगाई दि.17 मार्च – आज पहाटे 3 वाजता भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी (Dilip Ghandhi) यांचे दिल्लीत तर अंबाजोगाई (Ambajogai) येथील ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय दमकोंडवार यांचे पहाटे 2 वाजता पुण्यात कोरोनावर उपचार सुरु असताना निधन झाले. यासोबतच राजधानी दिल्लीमध्ये भाजपचे मंडी, हिमाचल प्रदेशचे खासदार रामस्वरुप शर्मा (Ram Swaroop Sharma) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
(Former minister in Ahmednagar and journalist killed in Ambajogai due to corona; MP commits suicide in Delhi)
राजधानी दिल्लीमध्ये भाजपचे (BJP) मंडी, हिमाचल प्रदेशचे खासदार रामस्वरुप शर्मा (Ram Swaroop Sharma) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. गोमती या खासदार निवासस्थानी पहाटे त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार रामस्वरूप शर्मा यांचं घर आतून बंद होतं. त्यांनी गळफास घेतलेला होता. पोलिसांनी सांगितलं की त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं मात्र दवाखान्यात पोहोचण्या आधीच त्यांचा मृत्यू झाला.
अहमदनगर (Ahemdnagar) येथील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी (Dilip Ghandhi) यांचे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. दिलीप गांधी यांचा कोरोना रिपोर्ट काल कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आला होता. काल दुपारपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप गांधी हे अहमदनगर (Ahemdnagar) लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार होते.
अंबाजोगाई (Ambajogai) येथील ज्येष्ठ पत्रकार दत्ता दमकोंडवार (५५) यांच्यावर पुणे येथे मागील पंधरा दिवसांपासून उपचार सुरु होते. ते काही दिवसांपुर्वी कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) आले होते. आज पहाटे 3 च्या सुमारास उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. दमकोंडवार शांत, संयमी व मितभाषी स्वभावाचे असल्याने त्यांच्या निधनामुळे अंबाजोगाईसह बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. भाजपाने नेते रमेश आडसकर यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. दमकोंडवार यांच्या पश्चात पत्नी, मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे पत्रकारितेतील न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.