संचारबंदीत प्रशासना कडून घरपोच व्यवस्था

किल्लेधारूर दि.३१(वार्ताहर) गेल्या चार दिवसांपासून असलेल्या संचारबंदीत नागरीकांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे शहरात घरपोच अत्यावश्यक किराणा सामान पुरवण्याचे नियोजन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
दि.२८ रोजी शहरात कोरोना बाधित आढळून आल्यामुळे अनिश्चित काळासाठी संचारबंदी लावण्यात आली आहे. या संचारबंदी काळात नागरीकांना घराबाहेर पडून अत्यावश्यक वस्तू खरेदीस अडचण निर्माण झाली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे नगर परिषदेच्या वतीने निडली ॲपचा वापर करुन नागरीकांना घरपोच अत्यावश्यक किराणा सामान पोहोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरात प्रभाग, गल्ली, कॉलनी निहाय दुकानदारांची यादी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निडली ॲपचा वापर करुन नागरीकांनी मागणी केल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी ९ ते १२ यावेळेत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत घरपोच करण्याची व्यवस्था केली आहे. यात शहरातील विविध भागातील ठोक व किरकोळ अशा २६ किराणा दुकानांचा तर घरपोच सेवेसाठी १६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नागरीकांनी याकाळात प्रशासनाच्या सर्व सुचनांचे पालन करत अनावश्यक मागणी टाळण्याचे आवाहन नगर परिषद व तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.