धारुरचे सुहास सिरसट ‘वाय’ चित्रपटाच्या माध्यमातून चर्चेत.

किल्लेधारूर दि.4 जुलै – धारुरचे सुहास सिरसट ‘वाय’ चित्रपटाच्या माध्यमातून चर्चेत आले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘वाय’ या मराठी चित्रपटात सुहास सिरसट यांनी सहाय्यक अभिनेत्याची भुमिका उत्कृष्टरीत्या बजावत आपल्या अभिनयकौशल्याचे प्रदर्शन केले आहे.
महाराष्ट्रात समाजातील सद्यस्थितीचे वास्तव दर्शन करणारा सत्य घटनेवर आधारीत ‘वाय’ हा मराठी चित्रपट नुकताच (दि.24 जुन) प्रदर्शित झाला. अजित वाडीकर लिखित दिग्दर्शित ‘वाय’ या चित्रपटात धारुरचा सुपूत्र सुहास सिरसट सहाय्यक अभिनेत्याची भुमिका बजावत आहे. चित्रपटातील कथानकात गर्भलिंग निदान, गर्भपात, स्त्रीभ्रूणहत्येच्या कथा (केस) एकमेकांशी संलग्न करुन सांगितल्या आणि दाखवल्या आहेत. समाजातील सध्याच्या मुलगा, मुलगी भेदभाव, गर्भलिंग निदान, पुरुषी मनोवृत्ती व स्त्री अत्याचाराचा समावेश आहे. सध्या राज्यात अवैध गर्भलिंग निदान प्रकरणे चांगलीच गाजत असून यात बीड जिल्हा आघाडीवर आहे.
सिनेमात मुक्ता बर्वे (डॉ. आरती देशमुख) या अभिनेत्रीने सक्षम शासकीय अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा उत्कृष्टपणे निभावली आहे. व्यक्तिरेखेतील मानवतावादी भाव आणि कार्यतत्परतेचं दर्शन त्यात दिसून येते. तर दुसरीकडे क्रूर कृत्य करणारा डॉ. पुरुषोत्तम (नंदू माधव) आणि त्याचा सहकारी (सुहास सिरसाट) यांचं अभिनयकौशल्य सिनेमात दिसून येते. प्राजक्ता माळी आणि संदीप पाठक यांनी देखील चित्रपटात भुमिका साकारल्या आहेत.
सुहास सिरसट याने साकारलेल्या भुमिकेचे कौतूक होत आहे. सुहास सिरसट यांनी यापुर्वीही अनेक मराठी चित्रपटात वेगवेगळ्या भुमिका साकारलेल्या आहेत. झी वाहिनीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेतील भुमिकेमुळे सुहास सिरसट यांची राज्यातील घराघरात दत्ताभाऊ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. सिरसट यांनी अभिनयातील अनेक पुरस्कार मिळाली आहेत. ‘वाय’ चित्रपटाच्या माध्यमातून ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
( Dharur’s Suhas Sirsat in discussion through the movie ‘Y’. )