नगराध्यक्ष आरक्षण सोडतीची उत्सुकता शिगेला; निवडीसाठी फेब्रुवारी महिना उजाडणार.

मुंबई दि.27 जानेवारी – महाराष्ट्रात नुकत्याच 106 नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या असून आता नगराध्यक्ष (mayor) पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा होणार आहे. आज गुरुवारी (दि.27) नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडती होणार असून कोणत्या नगर पंचायतमध्ये कोणाला आरक्षण सुटणार याची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.

(Curiosity about the mayoral reservation draw increased; The month of February will dawn for selection.)

राज्यात 106 नगर पंचायतच्या निवडणूका होवून मतमोजणी अंति सत्तेवर कोणत्या पक्षाचा दावा असणार हे सिद्ध झाले आहे. मात्र नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत झालेली नसल्याने पुढील निवडी प्रलंबित आहेत. नगरपंचायतींवर सध्या प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडी केव्हा होणार? हा प्रश्न निवडून आलेल्या नगरसेवकांना पडला आहे.

राज्य सरकारचे नगरविकास खाते (Urban Development Department) नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित करणार आहे. त्याची सोडत आज सांयकाळी 4 वाजता निघणार आहे. ही आरक्षणाची (reservation) सोडत निघाल्यानंतर त्यासंबंधीचे गॅझेट प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर राज्य सरकार त्या-त्या जिल्ह्यांच्या नगरविकास विभागाकडे आरक्षणाची यादी पाठवणार आहे. त्यानुसार पुढे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. ही सगळी प्रक्रिया पार पडेपर्यंत फेब्रुवारी महिना उजाडण्याची शक्यता आहे.

अशी होणार आरक्षण सोडत…
या सोडतीच्या ऑनलाईन बैठकीसाठी कोविड-19 च्या संक्रमणाचा प्रादुर्भाव पाहता विहित केलेले आरोग्यविषयक निकष विचारात घेता सदर सोडतीसाठी संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी मंत्रालयात उपस्थित राहण्याऐवजी संबंधित जिल्ह्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेशात सूचित करण्यात आले आहे.

सदर सोडतीची प्रक्रिया ऑनलाईन बैठकीद्वारे पार पडणार असून संबंधित जिल्ह्यांच्या विभागीय कार्यालयात दूरदृश्यप्रणालीची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रधान सचिव यांनी दिल्या आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालयातील कर्मचारी आणि नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील 10 लोकप्रतिनिधींना विभागीय कार्यालयात प्रवेश निश्चित केला आहे. सध्या ओबीसी आरक्षणाशिवाय या पदाची निश्चिती होणार आहे. अनु.जाती व जमाती व महिला प्रवर्गाचे आरक्षण असणार आहे.

बीड जिल्ह्यात पाच नगराध्यक्ष
बीड जिल्ह्यात पाच नगर पंचायतच्या निवडणूका पार पडल्या. यात केज, वडवणी, आष्टी, पाटोदा व शिरुर कासार या नगर पंचायतीचा समावेश आहे. यातील आष्टी, पाटोदा व शिरुर कासार या तीन नगर पंचायतीवर भाजपाचे (BJP) निर्विवाद वर्चस्व आहे. वडवणी येथे आ. प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व माजी आमदार केशव आंधळे यांच्या आघाडीने बहुमत मिळवले आहे.

सध्या वडवणीचे राष्ट्रवादी व आघाडीचे नगरसेवक जि.प. सभापती जयसिंग सोळंके यांच्या निगराणीत निकाल घोषित झाल्यापासून सहलीवर आहेत. केजमध्ये (Kaij) मात्र जनविकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांची युती झाली असून आता नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष कोणाकडे असणार याची उत्कंठा लागली आहे. आज होणाऱ्या आरक्षण सोडतीनंतर नगराध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार हे निवडीनंतरच स्पष्ट होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!