धारुरच्या कोव्हिड केअर सेंटरवरील डॉक्टरवर कारवाई;

किल्लेधारूर दि.11 मे – किल्लेधारूर तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असून तालुका पातळीवर तीन ठिकाणी कोविड केअर सेंटर (Covid Care Center) सुरु करण्यात आली आहेत. यातील केज रोडवर असलेल्या कोविड सेंटरवरील डॉक्टरांच्या तक्रारी वाढल्यामुळे तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी आज दि.11 मे रोजी थेट भेट देत पंचनामा केला. यात गैरहजर व दोषी आढळलेल्या डॉक्टरवर कार्यमुक्तीची कारवाई करण्यात आली.
(Action against doctor at Dharur’s Covid Care Center;)
धारुर (Dharur) शहरासह तालुक्यात रुग्ण संख्या वाढल्यामुळे 260 खाटांची क्षमता असलेले तीन कोविड केअर सेंटर (Covid Care Center) सुरु करण्यात आली. सारूकवाडी रस्त्यावरील सामाजिक न्याय विभागाच्या मुलीच्या वस्तिगृहात (Hostel) एक, त्याच ठिकाणी शिक्षण विभागाच्या वस्तिगृहात (Hostel) दुसरे व केज रोडवर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात तिसरे कोविड सेंटर आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील रुग्णांची सोय भाजपा नेते रमेश आडसकर यांनी केली आहे. मात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या सेंटरवर नियुक्त केलेल्या डॉक्टरांच्या नेहमीच तक्रारी येत होत्या.
आज मंगळवार दि.11 रोजीही अश्याच तक्रारी आल्या. त्या पाहण्यासाठी तहसीलदार वंदना शिडोळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती डिकले व डॉ. अमोल दुबे यांनी थेट कोविड सेंटरवर पाहणी केली. यावेळी सदरील डॉक्टरचा हलगर्जीपणा उघड झाला. त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित नसल्याने त्याला तडकाफडकी कार्यमुक्त करण्याची कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती घेतली असता सदरील डॉक्टर हे इतर खाजगी ठिकाणी कार्यरत आहेत. यामुळे पुर्णवेळ शासकीय कर्तव्य निभावण्यात कसुर करत आहेत. रुग्णांच्या तक्रारी वाढल्यामुळे सदरील कारवाई करण्यात आली. सध्या येथील कोविड सेंटर चांगलीच चर्चेत आलेली असुन रुग्णांचा परिसरात बिनधास्त मुक्त संचार सतत चर्चेचा विषय आहे. या इतर कोविड सेंटरवरही अशी धाडसी कारवाई करुन दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.