युपीएससीत लातूरची गगन भरारी;
खेड्यातील मुलाला 202 तर शिक्षकाच्या मुलाला 149 वी रँक.

लातूर दि.30 मे – मागासलेल्या मराठवाड्यात आता स्पर्धा परिक्षांत गगन भरारी मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. गतवर्षी लातूर जिल्ह्यातून सहा जणांनी युपीएससीत यश मिळवले होते. यंदा लातूर जिल्ह्यातील शुभम भोसले याने (UPSC) परीक्षेत देशात 149 वी तर रामेश्वर सब्बनवाड याने 202 वी रँक मिळवली आहे. यंदा महाराष्ट्रातील 31 जणांनी यश मिळवले आहे.
अभियांत्रिकी आणि वैद्यकिय प्रवेशपुर्व परीक्षेतच नव्हे तर स्पर्धा परीक्षेतही आता मराठवाड्याचा (Marathwada) दबदबा निर्माण होत आहे. गतवर्षी बीड (Beed) व लातूरमधून (Latur) आठ विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा सर केली होती. यात एकट्या लातूर जिल्ह्यातून सहा जणांनी बाजी मारली होती. आज जाहिर झालेल्या प्राप्त निकालानुसार लातूर जिल्ह्यात यंदा दोघांनी या परीक्षेत बाजी मारली आहे.
किल्लारीच्या शुभम संजय भोसले याने देशात 149 वी रँक मिळवून यशाची पताका फडकाविली आहे. पदवी परीक्षेचे शिक्षण घेतानाच शुभमने तयारी केली अन् दुसऱ्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला आहे. मुळचा किल्लारीचा असलेल्या शुभमचे प्राथमिक शिक्षण औसा येथील मुक्तेश्वर विद्यालयात झाले. तर आठवी ते दहावी प्रकाशनगर येथील सरस्वती विद्यालयात झाले असून, अकरावी व बारावीचे शिक्षण दयानंद विज्ञान महाविद्यालयात पुर्ण केले. दहावी 98 टक्के तर बारावीत 89 टक्के घेतलेल्या शुभमने मुंबईच्या एस.पी. कॉलेजमधून बी.टेकचे शिक्षण पुर्ण केले. बी.टेकला असतानाच स्पर्धा परीक्षेतून करिअर करण्याचा निश्चय शुभमचा होता. जिल्हा परिषदेत शिक्षक असलेले त्याचे वडील संजय भोसले यांनी शुभमला प्रोत्साहन दिले.
खेड्यातल्या किराणा दुकानदाराच्या मुलाचे यूपीएससीत यश…
घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही त्यावर मात करीत उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या खेडेगावातील किराणा दुकानदाराचा मुलगा रामेश्वर सब्बनवाड याने यूपीएससी परीक्षेत 202 वी रँक मिळवित यश मिळविले आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्याच प्रयत्नात त्याने यशाची पताका लावली असून, गावातील पहिला यूपीएससी उत्तीर्ण होण्याचा मानही मिळविला आहे. रामेश्वर सुधाकर सब्बनवाड हा उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील आहे. कुटुंबात आई-वडील आणि एक भाऊ आहे. कुटुंबास एकरभरही शेती नाही. त्यामुळे उदरनिर्वाह हा छोट्याशा किराणा दुकानावर आहे.
रामेश्वरचे प्राथमिक शिक्षण गावातील रामराव पाटील प्राथमिक विद्यामंदिरात झाले. त्यानंतर 5 वी ते 10 वीपर्यंतचे शिक्षण लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात पूर्ण झाले. 12 वी पुणे येथील भारतीय जैन संघटनेच्या महाविद्यालयात झाली. त्याच्या आईचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असतानाही मुलगा शिकून डॉक्टर व्हावा अथवा कलेक्टर व्हावा, अशी इच्छा होती.
परंतु, घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्याने नाइलाजास्तव पुण्यातील शासकीय महाविद्यालयात सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने 8 महिने खासगी कंपनीत नोकरी केली. तद्नंतर 16 महिने मुलांची शिकवणी घेतली. दरम्यान, आईची दुसरी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने 2019 पासून यूपीएससीची तयारी करण्यास सुरुवात केली. 2020 मधील पहिल्या प्रयत्नात तो मुलाखतीपर्यंत पोहोचला. परंतु, अवघे सहा गुण कमी पडल्याने यश मिळाले नाही. त्यामुळे त्याने पुन्हा प्रयत्न सुरू केला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने हे यश संपादन केले आहे.
( Successful flight of Latur with UPSC; The village youth is ranked 202nd while the teacher’s son is ranked 149th. )