चक्क सुनांना बसवले गौराईच्या मखरात; सासूबाईचं महाराष्ट्रात कौतूक.

वाशिम दि. 14 सप्टेंबर – सध्या घराघरात गौराईचं आगमन झालेलं दिसून येत आहे. मात्र वाशिम (Washim) जिल्ह्यातील एका सासूनं चक्क आपल्या दोन्ही सुनांना गौराईच्या मखरात बसवून त्यांना गौरीचं रूप दिलं. ऐवढंच नाही तरा गौराई आगमनापासून तर विसर्जनापर्यंत त्यांची पूजा करीत सण (festival) साजरा करत असल्यामुळे तिचं अख्ख्या महाराष्ट्रातून (Maharashtra) कौतूक होत आहे.
(Chakka Sunanna Basavale Gaurai’s makhrat; Mother-in-law appreciated in Maharashtra.)
राज्यभरात गौराईचा सण पारंपारिक पद्धतीने गौराई मूखवट्यांची पूजा करून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र वाशिम शहरातील सिंधुबाई सोनुने या आपल्या दोन सुनांनाच गौराई म्हणून बसवून तीन दिवस हा सण साजरा करत आहेत. सिंधुबाई सोनुने यांनी सुनामध्येच गौराई बघून केलेल्या या वेगळ्या उपक्रमामुळे जिल्हाभरातून त्यांचं कौतुक होत आहे.
वाशिम शहरात राहणार्या सिंधुबाई सोनुने या सासू आपल्या घरी गौरी पूजन सोहळा रेखा सोनुने व पल्लवी सोनुने या दोन्ही सुनांची पूजा अर्चना करून त्यांना देवी स्वरुपात समजून साजरा करत आहेत. त्यांनी जिवंत चालत्या बोलत्या महालक्ष्मींचा अशा प्रकारे सोहळा साजरा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
हा गौरी पूजन सोहळा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. सासू आणि सुना यांच्यामधील एक अनोखं नातं निर्माण होऊन आपसात सलोखा आणि जिव्हाळा कायम राहावा असा आपला उद्देश असल्याचे सिंधुबाई सोनुने यांनी सांगितलं आहे.
घराघरात सासू आणि सूनेचं भांडण आपण नेहमीच बघतो. मात्र सिंधुबाई या त्याला अपवाद ठरल्या आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या सासूबाईंचा अभिमान वाटत असल्याचं त्यांच्या गौराई म्हणून पूजन होत असलेल्या सुनबाई रेखा सोनुने, यांनी मोठ्या अभिमानाने सांगितलं.