किल्ले धारुरकरांना पहिल्यांदाच मिळणार हा मान… महाराष्ट्र केसरीसाठी दोघां भावांची निवड

किल्लेधारूर दि.२६ (प्रतिनिधी)- किल्ले धारुर तालुक्यातील भोगलवाडी येथील दोन चुलत भावांची यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ओपन गटातुन निवड झाली आहे. याबद्दल मुंडे बंधुंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र केसरीसाठी यापूर्वी आष्टीच्या सईद चाऊस या मल्लाने मजल मारत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावलेला आहे.
(Kille Dharurkar will get this honor for the first time … Selection of two brothers for Maharashtra Kesari)
किल्ले धारुर (Kille Dharur) तालुक्यातील डोंगरदऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या भोगलवाडी येथील उपसरपंच बळीराम मुंडे यांचा मुलगा गणेश व शाहु कुस्ती केंद्र कोल्हापुरचे (Kolhapur) संचालक तथा वस्ताद जालिंदर आबा मुंडे यांचा मुलगा सुरज या दोन सख्या चुलत भावांची महाराष्ट्र केसरी बीड जिल्हा कुस्ती निवड चाचणीसाठी निवड झाली होती. सदर चाचणी स्पर्धा दि.२४ फेब्रुवारी रोजी आहेर चिंचोली ता.बीड येथे घेण्यात आली. गणेश व सुरज या दोन्ही मुंडे बंधुंनी महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) चाचणी स्पर्धेसाठी खुल्या गटातुन सहभाग घेतला होता.
यात दोघांनीही आपल्या प्रतिस्पर्धी मल्लास आसमान दाखवत आगामी होणाऱ्या प्रतिष्ठेच्या व सर्व महाराष्ट्रासाठी लक्षवेधक ठरणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी खुल्या गटातुन बीड जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा बहुमान मिळवला. गणेश व सुरज हे दोघे सख्खे चुलत भाऊ असुन, त्यांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड आहे. त्यातच सुरजचे वडिल जालिंदर आबा मुंडे हे जुने पहिलवान असुन, त्यांचे कोल्हापूर येथे स्वत:चे शाहु कुस्ती केंद्र आहे. या कुस्ती केंद्राने कोल्हापुर (Kolhapur) जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेला आहे.
हे दोघेही याच कुस्ती केंद्राच्या तालमीत व वस्ताद जालिंदर आबा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आहेत. भोगलवाडी सारख्या डोंगरदऱ्यातील हे दोन मल्ल महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेसाठी खुल्या गटातुन बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांच्यामुळे भोगलवाडीसह धारूर तालुक्याचे नाव राज्यभर गाजणार आहे. याबद्दल गणेश बळीराम मुंडे व सुरज जालिंदर मुंडे या दोन भावांवर बीड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.