मराठवाडा-विदर्भ सिमा बंद; केंद्रेकरांनी केल्या या सुचना….

औरंगाबाद/परभणी : दि.२४- मराठवाड्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी सर्व यंत्रणांना दिले. दरम्यान, परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर (Dipak Muglikar) यांनी जिल्ह्यातून विदर्भात जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व वाहतुकीला निर्बंध घातले असून कोणतेही वाहन जाण्या-येण्यास मज्जाव केला आहे. यामुळे मराठवाडा-विदर्भ (Marathwada-Vidarbha) सिमा बंद झाली.
(Marathwada-Vidarbha border closed; These suggestions made by Kendrakar)
कोरोना (corona) संसर्गाची दुसरी लाट तीव्र असण्याची शक्यता आहे. नागरिक मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात धुणे विसरू नये, यासाठी जनजागृती तर करावीच, शिवाय बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, असेही विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, जि. प. सीईओंना याबाबत सूचना दिल्या आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मास्क वापरणे, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत नागरिकांना जागृत करणे आवश्यक आहे. पोलीस अधीक्षकांशी आयुक्त सुनिल केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी संपर्क करून सूचना दिल्या, तर मनपा आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना देखील त्यांनी, नागरिकांनी मास्क वापरण्याबाबत मोहीम राबविण्याबाबत सांगितले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्याची सुरक्षितता ही प्रत्येकाच्या हातात असून मास्क, सॅनिटायजर व सुरक्षित अंतर ही त्रिसुत्री कोरोनाच्या तावडीपासून बचावणारी असल्याने याचे काटेकोर पालन नागरिकांनी स्वत:हून करणे अपेक्षित आहे. यात जर कोणी बेफिकरी करत असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाईसह इतरही निर्बंध घालू या शब्दात परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी जनतेला खडेबोल सुनावत कर्तव्याची जाणीव करुन दिली आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोनाचे (corona) वाढते प्रमाण लक्षात घेता तशी परिस्थिती जिल्ह्यात उद्भवू नये यासाठी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी कायद्याचा बडगा उगारला. मुख्य बाजारपेठेत त्यांनी दोन दुकानात जाऊन पाहणी केली. मास्क न घातलेल्या दुकानदारांना प्रत्येकी ५-५ हजारांचा दंड त्यांनी ठोठावला. याचबरोबर रस्त्यावर असणारे फळ विक्रेते, अंडे विक्रेते व विनामास्क फिरणाऱ्या लोकांशी त्यांनी संवाद साधून “मी जबाबदार” च्या कर्तव्याची जाणीव करुन दिली.
परभणी जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती अधिक गंभीर होऊ नये यादृष्टिने जिल्ह्यातून विदर्भात जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व वाहतुकीला निर्बंध घातले असून कोणतेही वाहन जाण्या-येण्यास मज्जाव केला आहे. ज्या तातडीच्या सेवा-सुविधा असतील त्या विचारात घेऊन प्रवेश करण्यापूर्वीच त्यांची अँटिजन टेस्टींग बंधनकारक केली आहे. परभणी जिल्ह्याच्या सिमांवर विशेष चौकी लावण्यात आली असून त्याठिकाणी पोलिसांमार्फत निगराणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर (Dipak Muglikar) यांनी सांगितले.