क्राईम न्यूज… बीड जिल्ह्यात पुन्हा खून; मित्राने डोक्यात दगड घालून केला घात.

बीड दि.26 मार्च – बीड (Beed) जिल्ह्यात रेल्वेच्या कामासाठी आलेल्या दोन परप्रांतिय मजुरात दारुच्या नशेत झालेल्या किरकोळ भांडणातून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. नाकावर बुक्की मारल्यामुळे रागावलेल्या मित्राने रात्री झोपेत असलेल्या मित्राला डोक्यात दगड घालून ठार (Murder) केले. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंद केला.
अहमदनगर -बीड -परळी रेल्वे (Ahemadnagar Beed Parli Railway) मार्गाचे काम जिल्ह्यात सुरू आहे. या कामावर पश्चिम बंगाल येथील मजुर आलेले आहेत. यातील काही मजुर ढेकणमाह येथे राहतात. शुक्रवारी (दि. 25) रोजी रात्री सिमुल बिस्वास पिता निपेंद्रनाथ बिस्वास आणि हैदरअली तरफदार पि. अब्दुल होसाईन या दोघा मजुरांमध्ये दारुच्या नशेत भांडण होऊन किरकोळ मारहाण झाली.
याचा राग मनात धरून सिमुल बिस्वास याने रात्री 2 वाजण्याच्या सुमारास झोपेत असलेल्या हैदरअलीच्या डोक्यात दगड घालून ठार केले. स्वतः गुत्तेदाराला हैदरअलीचा खून केल्याच सिमुल बिस्वास याने सांगून गुन्हा कबूल केला. यानंतर गुत्तेदाराने पिंपळनेर पोलीसांना (Police) घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गुत्तेदार सुशांत मंडल यांच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला. दारुच्या नशेत झालेल्या भांडणात नाकावर बुक्की मारल्याच्या रागातून झोपेत असलेल्या मजुराच्या डोक्यात दगड घालून सहकाऱ्याने खून केल्याची घटनेने ढेकणमोह परिसरात खळबळ उडाली आहे.
( Crime News … Murder again in Beed district; The friend struck him on the head with a stone. )