केज तालुक्यात पुन्हा वाटमारी ; वाहन अडवून 72 हजारांचा ऐवज लुटला.

47 / 100

केज दि.28 सप्टेंबर – केज तालुक्यात पुन्हा वाटमारीचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याकडे जात असलेल्या वाहनाला अडवून सहा जणांनी कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम व महिलांच्या अंगावरील दागिने असा एकूण 72 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना मंगळवारी (दि.27) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडला.

केज तालुक्यात काही महिन्यापुर्वी रस्त्यावर जॕक टाकून वाहनधारकांना लुटल्याच्या घटना घडल्या होत्या. यापाठोपाठ आज पुन्हा केज-मांजरसुंबा रस्त्यावर कोरेगाव पाटी जवळ लुटीची घटना घडली आहे. काळ्या कपड्याने तोंड बांधून आलेल्या टोळक्याने वाहन अडवून ऐवज लुटला. याप्रकरणी सहा अज्ञात आरोपीच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात (Kaij Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनाजी किसनराव भोसले हे पुणे (Pune) जिल्ह्यातील कुरुळी (ता. खेड) येथे स्थायिक आहेत. चुलत्याचे निधन झाल्याने ते कुटुंब व इतर नातेवाईकांसह अंत्यविधीसाठी खतगाव (जि. नांदेड) येथे आले होते. रक्षा सावडण्याचा विधी उरकून परत पुणे येथे पिकअप (क्रमांक एम.एच.12 टी व्ही 3905) या वाहनाने जात होते.

दरम्यान केज-मांजरसुंबा महामार्गावर कोरेगाव पाटी जवळ असताना पाठीमागून एक कार आली. कार ओव्हरटेक करुन पिकअपला आडवी लावत आतून काळ्या कपड्याने तोंड बांधलेले सहाजण उतरले. त्यांच्या हातात धारदार कोयते होते. यावेळी कोयत्याच्या मुठीने एकास मारहाण करून दहशत निर्माण केली. पिकअपची चावी काढून धमकी देत धनाजी भोसले व शंकर भोसले यांच्या जवळील 8 हजार 370 रुपये रोख रक्कम तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम, पॅनकार्ड, आधार (Aadhar), क्रेडिट कार्ड असे साहित्य जबरदस्तीने काढून घेतले. यानंतर महिलांकडे मोर्चा वळवून दोन महिलांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने लुटले. यात एकीचे 36 हजार तर दुसऱ्या महिलेचे 8 हजार किंमतीचे दागिने ओरबाडून घेतले. एकूण 72 हजार 370 रुपयांचा ऐवज घेऊन लुटारू केजकडे पसार झाले. यावेळी पिकअप मध्ये धनाजी भोसले, दत्ता भोसले, शंकर भोसले, शंकर यादव, समर्थ यादव, माधव टेकाळे, राम नखाते, विमलबाई घाटके, अनुसया भोसले, अंबिका परशुराम यादव हे प्रवास करत होते. केज पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास केज पोलीस करीत आहेत.
( A vehicle was intercepted and robbed in Kaij taluka; 72 thousand was stolen after blocking the vehicle. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!