चालकाला कोरोंटाईन न करता पुन्हा औरंगाबादला पाठवले
शासनाचा रेड झोनचा नियम धाब्यावर

किल्लेधारूर दि.२४(वार्ताहर) राज्याच्या सिमेवरुन परतलेल्या चालकांना होम कोरोंटाईन न करता परत औरंगाबाद सारख्या रेड झोनला पाठवून चालकाच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार धारुर आगाराकडून घडला असून याबाबत आगार प्रमुख व प्रभारीनी दिलेल्या माहितीनूसार चालकाची केवळ वैद्यकीय चाचणी केली असल्याचे कळते.
सध्या कोरोना पासुन बचाव करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने विविध उपाययोजना सुचवलेल्या आहेत. या सुचनांचे पालन करणे आपत्ती व्यवस्थापन कायदा अमंलबजावणीत अनिवार्य केले आहे. रेड झोन मधून येणाऱ्या शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना २८ दिवस होम कोरोंटाईन करुन त्याच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखाची आहे. यात राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहकाचाही समावेश आहे. येथील रा.प.म. च्या तीन बसेस मधून दि.१२ मे रोजी मध्य प्रदेशच्या मजूरांना सहा चालकांनी राज्याच्या सिमेपर्यंत सोडले होते. जवळजवळ चारशे किलोमीटरचा प्रवास करुन व औरंगाबाद सारख्या रेड झोन मधून प्रवास करुन हे बसेस परतले होते. दि.२२ रोजी रात्री देखील बिहारच्या मजूरांना औरंगाबाद येथे बस द्वारे सोडण्यात आले. विशेष म्हणजे दहा दिवसांपुर्वी सिमेवरुन परतलेल्या चालकालाच परत औरंगाबादला पाठवण्यात आले होते. याबाबतीत आगार प्रमुख शंकर स्वामी व प्रभारी भारत कोमटवार यांना विचारले असता संंबंधित चालकाची वैद्यकीय तपासणी करुन पुन्हा परवानगी दिल्याचे सांगितले. चालकाला होम कोरोंटाईन करण्याच्या बाबतीत मात्र त्यांना माहिती देता आली नाही. यामुळे चालकांच्या जिविता बरोबर खेळण्याचा प्रकार होत असल्याचे दिसुन आले.