नसता होईल लग्न किंवा अंत्यविधीत गुन्हा नोंद…

बीड दि.९(प्रतिनिधी) परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे निदर्शनास आल्यामुळे बीड जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना २८ दिवस अलगीकरणात राहण्याच्या सुचना देत लग्न व अंत्यविधीला हजर न राहण्याची ताकिद देवूनही उपस्थित राहिल्यास दिवाणी व फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज काढले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या दि.३१ मे च्या आदेशान्वये अंत्यविधीसाठी १० तर लग्न कार्यासाठी ५० व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. परंतू इतर जिल्हा किंवा राज्यातून व्यक्ती आल्यास त्यास २८ दिवस स्वतःहून होम कोरोंटाईन राहणे अपेक्षित आहे. परंतू तसे न होता सदरील व्यक्ती अंत्यसंस्कार किंवा विवाह समारंभात हजर राहत आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. या अनुषंगाने अशा बाहेर जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्या व्यक्तीस अशा समारंभाना उपस्थित न राहता २८ दिवस परिवारासह होम कोरोंटाईन राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर अशा व्यक्ती विवाह समारंभ व अंत्यविधी सारख्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास संबंधित व्यक्ती व ज्यांच्या मार्फत कार्यक्रम आयोजित झाला त्यांच्या वर तात्काळ गुन्हा नोंदवला जाणार आहे. यात वधू-वर व त्यांचे आई वडील यांना विवाह समारंभापुरती तसेच निधन झालेल्या व्यक्तीचे जवळचे नातलग यांना तेवढ्या पुरती सुट देण्यात आली आहे.