पुजा चव्हाणच्या आई वडिलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; कुटूंबियांचे पत्र व्हायरल

मुंबईः दि.१ मार्च- काल पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan suicide case) वनमंत्री संजय राठोड यांनी पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) यांच्याकडे सूपुर्द केला. यानंतर चव्हाण कुटूंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत पत्र दिले. आमच्या मुलीचा बळी गेला पण या मृत्यूच्या आड राजकारण करून दररोज होणाऱ्या आरोपाने तिचा रोज बळी जात आहे. याचे राजकारण करून वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा बळी घेऊ नका असे मन हेलावून टाकणारे पत्र पूजा चव्हाणच्या आई-वड़िलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
(Puja Chavan’s parents meet CM; Family letter goes viral)
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (Pooja Chavan suicide case) गेली २० दिवस मोठे राजकारण झाले. विरोधकांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभर आंदोलन केले. यानंतर अखेर काल राठोड यांनी राजीनामा (Resignation) दिला. काल पूजा चव्हाणचे वडील लहूचंद्र चव्हाण, आई मंदोदरी चव्हाण व बहीण देवयानी चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात त्यांच्या मनातील वेदना आणि दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या समाजाची बदनामी थांबवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. सदरील पत्र सोशल माध्यमातून व्हायरल झाले असून यामुळे या प्रकरणात नवीन ट्विस्ट आले आहे.
ते या पत्रात पुढे म्हणतात की, आमची मुलगी कु.पूजा चव्हाण हिचे ७ फेब्रुवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. कोणत्याही माता-पित्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो. आमची ही वेदना आता कधीही भरून निघणार नाही. मुलीच्या अकाली निधनाच्या मृत्यूच्या दु:खापेक्षा अधिक त्रासदायक आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीच्या मृत्यूच्या संदर्भात जी चर्चा होत आहे तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेऊन उलटसुलट निराधार बातम्या येत आहेत.
आपण यासंबंधी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि या घटनेचा तपास वेगाने व्हावा व जे दोषी असतील त्यांच्यावर आपण निश्चितच कारवाई कराल याची आम्हाला खात्री आहे. आमच्या मुलीचा बळी गेला, पण फक्त संशयावरून कोणाचाही बळी जाऊ नये. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केलेली नाही. आमची मुलगी गमावली, पण या आड राजकारण करून दररोज होणाऱ्या आरोपाने तिचा रोज बळी जात आहे. याचे राजकारण करून संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीनामा (Resignation) घेऊ नका.
घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये
तपासात संजय राठोड किंवा अन्य कोणीही दोषी आढळले तर कठोर कारवाई करून न्याय द्यावा. पण संशयावरून मुलीवर किंवा कोणावरही आरोप करू नये. संजय राठोड (Sanjay Rathod) हे आमच्या समाजाचे नेते आहेत. कष्ट करून ते या पदापर्यंत पोहोचले आहेत. फक्त संशयावरून त्यांचा बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषींवर कारवाई करावी. राजकारणामुळे किंवा दबावामुळे घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये. आमचा आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे. आपण आम्हाला न्याय द्यावा, अशी विनंती पूजाचे आई-वडील व बहिणीने पत्रातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) यांना केली आहे.