रातोरात 580 कोरोना बाधितांचे स्थलांतर; प्रशासनाने अचानक का घेतला निर्णय?

मुंबई दि.16 मे – अरबी समुद्रात तौत्के चक्रीवादळ (Tauktae cyclone) घोंगावत आहे. या वादळामुळे आगामी काळातील वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता मुंबई पालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) आणि मुलूंड येथील कोविड आरोग्य केंद्रांतील रुग्ण हलवण्यात आली आहेत. या सर्व जम्बो कोविड सेंटर्समधील (Jumbo Covid centre) एकूण 580 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये रातोरात सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आले आहे.
(Migration of 580 corona victims overnight; Why did the administration take such a sudden decision?)
हे काम मुंबई महापालिकेने युद्धपातळीवर सुरु केले आहे. मुंबईचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.15 मे शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोना बाधित रुग्णांच्या (Corona Positive) स्थलांतरावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला.
यावेळी बोलताना, “तौत्के चक्रीवादळामुळे (Tauktae cyclone) मुंबईत ताशी सुमारे 60 ते 80 किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता आहे. तसा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या काळात जोरदार पाऊससुद्धा पडू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून हे वादळ जात आहे. या काळात वादळीवारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.
याच कारणामुळे खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोविड रुग्णांना स्थलांतरित केले जात आहे. प्रामुख्याने तीन जंबो कोविड (Jumbo Covid centre) आरोग्य केंद्रांतील मिळून एकूण 580 रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये आज रात्रीच (15 मे) सुरक्षितपणे स्थलांतरित करत आहोत,” असे अतिरिक्त आयुक्त काकाणी म्हणाले.
तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईतील तीन जंबो कोविड केअर सेंटरमधील एकूण 580 रुग्ण हालवण्यात येत आहेत. यामध्ये दहिसर कोविड केंद्रातील 183 रुग्ण, वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) कोविड केंद्रातील 243 रुग्ण आणि मुलूंड कोविड केंद्रातील 154 रुग्णांचा समावेश आहे. यात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असलेले रुग्ण, प्राणवायूच्या पुरवठ्यावर असलेले रुग्ण या वर्गवारीप्रमाणे स्थलांतर केले जात आहे.
दरम्यान, रुग्णांचे स्थलांतर करताना प्राणवायू पुरवणारे सिलिंडर्स, सुसज्ज रुग्णवाहिका, आवश्यकता भासल्यास इंजेक्शन व इतर यंत्रणांसह रुग्णांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याचे करण्याचे आदेश काकाणी यांनी दिलेले आहेत. रुग्णांना स्थलांतरित केल्यानंतर त्याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात येणार आहे.