माजलगाव येथील एक वर्षाच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू….

शिराळा : दि.२२- सांगली जिल्ह्यातील तडवळे ता. शिराळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात माजलगाव येथील सुफीयान शमशुद्दीन शेख या एक वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. या बालकाचे आई वडिल ऊस तोडणीसाठी सांगली जिल्ह्यात आलेले असताना ही घटना घडली. घटना आज दि.२२ सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
(A one-year-old boy from Majalgaon died in a leopard attack)
याबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, शमशुद्दीन निजामुद्दीन शेख (वय २७) हे आनंदगाव ता. माजलगाव जि बीड येथील रहिवासी आहेत. ते आपल्या पत्नी व एक वर्षाच्या मुलासह ऊस तोडणीसाठी तडवळे येथे शेतात गेले होते. तडवळे येथील मानकांडे शेतात कृष्णा शामराव पाटील या शेतकऱ्यांचा ऊस तोडत असताना मुलगा सुफीयान यास सावलीला मेव्हणीची सात वर्षाची मुलगी तरन्नुम हिच्या सोबत बसवले होते. सर्वजण ऊस तोडण्याच्या कामात मग्न होते. बालका सोबत असलेली तरन्नुम पाणी पीत असताना अचानक उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने (Leopard) पाठीमागून सुफीयान याच्यावर झडप घालून त्याची मान पकडून फरफट नेले. ते पाहून ती मुलगी ओरडल्याने सर्व ऊस तोडणाऱ्यांचे लक्ष तिकडे गेले. तो पर्यंत बिबट्या (Leopard) मुलास घेऊन उसात गेला. लोकांनी त्याचा पाठलाग केला असता मुलास उसात सोडून पळून गेला. मुलास घेऊन शिराळा उपजिल्हा रुग्णालयात आणले असता ते मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी सांगितले.
मुलाच्या मानेवर ११ व पोटावर ४ ठिकाणी अशा १५ ठिकाणी दातांच्या व नाख्यांच्या जखमा झाल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा एकच आक्रोश पहायला मिळाला. बिबट्याच्या मुक्त वावारामुळे तडवळे गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. आमदार मानसिंगराव नाईक, उपवनसंरक्षक सांगली वनविभागाचे (Forest Department) प्रमोद धानके यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. मयत बालकाच्या कुटुंबाला वन विभागामार्फत १५ लाखाची मदत देण्यात येणार असून, त्या पैकी ५ लाख रूपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित १० लाखाची मदत ही दहा वर्षांची मुदत ठेव स्वरूपात देण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाचे (Forest Department) उपवनसंरक्षक प्रमोद धानके यांनी दिली.