रस्त्यावरचे भांडण पडले महागात; अपघात होवून तीन ठार, सहा गंभीर…

सिल्लोड दि.13 जून – सिल्लोड भराडी रस्त्यावर वाडीफाट्याजवळ रस्त्याच्या मधोमध भांडण करणाऱ्या दोन मोटार सायकल स्वारांना, व भांडण सोडविणाऱ्या लोकांना दरोडेखोर समजून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात क्रुझर चालकाने उडवले. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला तर भांडण सोडवणारे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी मध्यरात्री झाला. या प्रकरणी पोलिसांनी (Police) अपघाताची नोंद घेतली आहे. या अपघातात भांडण करणाऱ्या एकाचा तर भांडण सोडविणाऱ्या दोघांचा नाहक मृत्यू झाला.
(Road rage became costly; Three killed, six seriously injured in road mishap)
या अपघातात (Accident) शेख नईम शेख मजिद वय 35 रा. कोतवालवाडा सिल्लोड, शेख हमीद शेख अमीन वय 25 वर्ष कोतवालवाडा सिल्लोड, गुलामनबी गणीखान पठाण वय 35 रा. मोढा खुर्द ता. सिल्लोड हे तिघे ठार झाले. तर अफजलखान मजीदखान वय 40 रा. ईदगाह नगर सिल्लोड, सोहेलखान इस्माईलखान वय 25 रा. शिवना ता. सिल्लोड, उजेफखा नूरखा रा. वांगी, समीरखा आसिफखा रा. वांगी ता. सिल्लोड, लक्ष्मण सखाराम कल्याणकर वय 45 रा. मोढाखुर्द ता. सिल्लोड, शेख फयाज अजीज वय 35 रा.बिडकीन ता. पैठण जिल्हा औरंगाबाद हे सहा जण जखमी झाले.
अधिक माहिती अशी की गुलामनबी गणीखान पठाण, उजेफखा नूरखा, समीरखा आसिफ, लक्ष्मण सखाराम कल्याणकर, शेख फयाज अजीज हे पाच जण सिल्लोड येथून मोढा गावाकडे दोन मोटारसायकल क्र. एम. एच . 20 इ. डब्ल्यू. 8453, एम.एच. 20 डी. बी. 2541 वरून जात असतांना भराडी रोडवरील वाडीफाट्याजवळ दोन्ही मोटारसायकल स्वारांमध्ये वाद झाला आरडा ओरड सुरू झाली व ते रस्त्यावर वाद करीत उभे राहिले.
तेव्हा रेलगाव कडून ट्रक.क्र. एम.एच. 20 इ. जि. 0932 मका घेऊन येत होता ट्रक मधे बसलेले मजूर शेख नईम मजिद, शेख हमीद शेख अमीन, सोहेल खान इस्माईल खान, अफजल खान मजीद खान यांनी ट्रक थांबवून मोटारसायकल स्वारांच्या मध्ये होत असलेला वाद सोडविण्याचा प्रयत्न केला.
मात्र हा गोंधळ सुरू असताना सिल्लोड येथून एक अज्ञात क्रूझर आली व तिने रस्त्यावर चोरटे किंवा दरोडेखोर आपली गाडी अडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजून वाहन न थांबवता थेट रस्त्यावर वाद करीत उभ्या असलेल्या नऊ जणांना जोराची धडक देऊन तर तिघांना चिरडून सुसाट वेगाने निघून गेला. यात तिघे ठार झाले तर सहा जण गंभीर झाले.
अपघातास कारणीभूत असलेल्या क्रूझरचा शोध सिल्लोड शहर पोलीस घेत आहे. सदरील अपघाताची नोंद सिल्लोड शहर पोलीस (Police) ठाण्यात घेण्यात आली असुन अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील अंधारे हे करीत आहेत.
जखमींवर उपचार सुरू……..
जखमींना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्रथम उपचार करून अधिकच्या उपचारासाठी इतरत्र हलविण्यात आले. यात शेख हमीद शेख अमीन याचा जागीच मृत्यू झाला होता तर शेख नईम मजिद याचा औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यात मृत्यू झाला. गुलामनबी गणी खान यांचा औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. काही जखमींवर सिल्लोड येथे तर काहींवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत.