महिला दिन विशेष….पोलिस ठाणे सांभाळणाऱ्या जिल्ह्यातील एकमेव महिला अधिकारी.

किल्लेधारूर दि.8 – शासनस्तरावर नेहमीच महिलांना समान संधी देण्याचा प्रयत्न केला जातो. किंबहुना यासाठी कठोर नियम व कायदेही केली जातात. परंतू ज्याच्या अंगात विविध गुण आणि कर्तबगारी असते तो कधीच मागे रहात नाही. मंग तो पुरुष असो की महिला. आज महिला दिनी (Women’s Day) अशाच एका कर्तबगार महिला अधिकाऱ्याबाबत मांडलेला हा विशेष लेख.

(Women’s Day Special …. The only woman officer in the district managing Police station)

गतवर्षी संपूर्ण जगभर कोरोना या भयंकर साथीने थैमान घातले. मार्च २०२० मध्ये महाराष्ट्रात कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होण्यास सुरुवात झाली. नेमके याच महिन्यात पहिल्यांदा धारुर पोलिस ठाण्याचा (Police station) कारभार पाहण्यासाठी एका महिला अधिकाऱ्यावर जबाबदारी टाकण्यात आली. लॉकडाऊनच्या अवघ्या दहा दिवसांपुर्वी पोलिस ठाण्याचा (Police station) प्रभार घेण्यासाठी सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा संजय धस (Surekha Dhas) यांची नेमणुक झाली. पोलिस ठाण्याचा पदभार घेताच कोरोना साथीने भयभीत जनतेला सावरण्याची व कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सुरेखा धस (Surekha Dhas) यांच्यावर आली. विशेष म्हणजे आपल्या मितभाषी स्वभाव व करारी बाण्यातून धस यांनी हि जबाबदारी लिलया पार पाडली. येवढेच नाही तर याकाळात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याचे कामही या महिला अधिकाऱ्यानी केले.

बीड येथे आपले प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण करणाऱ्या सुरेखा धस यांचा पोलिस खात्यातील सेवेचीही मनोरंजक वाटचाल आहे. धस यांना शालेय जीवनापासूनच कुटूंबियांनी मुक्त वावर दिल्याने कबड्डी सारख्या खेळात त्याकाळी त्यांनी नावलौकिक मिळवला. धस यांनी अगदी राष्ट्रीय पातळीपर्यंत कबड्डीत चमकदार कामगिरी करुन अनेक पदके मिळवली. राष्ट्रीय स्तरावरील ज्यूनियर व सिनियर कबड्डी संघात तब्बल 14 वेळेस निवड झाली. महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व केले. एम. ए. एम. पी.एड. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांना खेळात आणि शिक्षणासाठी घरातील आई, वडिल, भाऊ, बहिण यांचे खुप प्रोत्साहन भेटले. त्यामूळे खेळाडु वृत्ती, धाडस, नेत्रत्वगुण, सहनशिलता, सुसंवाद या गूणांचा विकास होण्यास मदत झाली.

सुरेखा धस यांचा पोलिस खात्याची सेवा मात्र त्यांच्या लग्नाच्या दहा वर्षानंतर सुरु झाली. पति संजय धस, सासु, सासरे, दीर आणि मुले यांच्या सहकार्यातून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी केली. व यात यशस्वी होवून पोलिस उपनिरिक्षक म्हणून सुरुवात झाली. यानंतर प्रशिक्षण पूर्ण होताच सोलापूर जिल्हयात पंढरपूर, मोहोळ, बार्शी येथे चांगले काम करत विविध गुन्ह्याच्या तपासात महत्वाची कामगिरी केली. पुढे सहाय्यक पोलिस निरिक्षक पदी पदोन्नती मिळाली.

सातारा जिल्हयातील फलटण पोलिस ठाणे येथे बदली झाली. तेथे महिला विषयक गुन्हयामधे तपास केला व अनेक आरोपीना शिक्षा झाली आहे. त्यानंतर उस्मानाबाद येथील कळंब पोलिस ठाणे येथे बदली झाली तेथेही चांगले काम केले. विनयभंगच्या एका गुन्ह्यामधे 24 तासात गुन्ह्याचा संपुर्ण तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात आरोपीला केवळ 6 दिवसात शिक्षा लागली. कदाचित येवढ्या गतीने अटक, तपास व शिक्षा होणारे हे पहिलेच प्रकरण असेल. याबरोबर दहशतवादी सेल मध्ये नेतृदिपक काम केले. तेथे काम करत असताना जून 2019 मधे बीड येथे बदली झाली. प्रथम परळी शहर पोलिस स्टेशन आणि जिल्हा वाहतुक शाखा येथे काम केल्यानंतर मार्च 2020 मधे धारुर पो स्टेशन येथे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. जिल्ह्यात पोलिस ठाण्याचा कामकाज पाहणाऱ्या त्या एकमेव महिला अधिकारी आहेत. एक महिला अधिकारी असतानाही नुकत्याच झालेल्या तपासणीत धारुर पोलिस ठाण्याला जिल्ह्यात नावलौकिक मिळवून दिला. धारूर पोलिस ठाण्याचा गून्हे निर्गती व अर्ज निर्गती मध्ये जिल्हयात दुसरा क्रमांक मिळाला आहे.

पोलिस ठाण्याचे कामकाज पाहत असताना वरिष्ठ अधिकारी जिल्हा पोलिस अधिक्षक आर. राजा, अतिरिक्त पोलिस अधिक्षक स्वाति भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी सावंत सर तसेच सहकारी अधिकारी सर्व पोलिस अमलदार यांचे चांगले सहकार्य व मार्गदर्शन मिळाल्याने हे शक्य झाल्याचे त्या सांगतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!