
किल्लेधारूर दि.११(वार्ताहर) शहरात शुक्रवारी आढळून आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या अतिजवळचा संबंध आलेली १८ तर संपर्कात आलेली १२ अशा ३० व्यक्तींचा आरोग्य विभागाच्या वतीने कॉन्टॕक्ट ट्रेसिंग केल्यानंतर उलगडा झाला. सदरील व्यक्ती मुलाचे लग्न जमवून सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमासाठी पुण्याहून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली.
शहरातील साठे नगर भागात पुण्याहून परतलेल्या एका ४२ वर्षीय व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. आरोग्य विभागाने आज बाधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला. यावेळी सदरील व्यक्ती मुलाचे लग्न जमवून सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमासाठी पुण्याहून आल्याची माहिती समोर आली. अंबेजोगाई जवळील वाघाळा येथील चार, अंजनडोह येथील बाधिताचे आई वडील व साठे नगर मधील काही व्यक्तींचा संपर्कात आलेल्यामध्ये समावेश असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली. दरम्यान साठे नगर भागाला संपुर्ण पणे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले असुन आज प्रभाग सुरक्षा समितीच्या वतीने सदरील भागात कोरोंटाईन नागरीकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. समिती सदस्यांकडून नागरीकांना आरोग्याची काळजी घेण्याचे व त्रास असल्यास थेट संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.