पुन्हा प्रेतयात्रा तहसील कार्यालयात…

किल्लेधारूर दि.२७(वार्ताहर) येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभुमीला जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावर आज दि.२७ आगस्ट गुरुवार रोजी दुसऱ्यांदा प्रेतयात्रा तहसील कार्यालयात नेण्यात आल्याची घटना घडली.
शहरातील लिंगायत समाजाची स्मशानभुमी तहसील कार्यालयाच्या दक्षिणेस सर्वे नं. ३७८ मध्ये ०.९९ आर स्मशानभुमीसाठी आहे. या जमिनीत लिंगायत समाजाच्या वतीने परंपरेनुसार दफनविधी करुन अंत्यविधी केला जातो. परंतू स्मशानभुमीकडे जाण्यासाठी सोडण्यात आलेल्या ६ मीटर रस्त्यावर अतिक्रमण असल्याने जेसिबी किंवा तत्सम वाहन, शववाहिका नेण्यास अडचणी येत असुन रस्ता मोकळा करुन देण्याची मागणी आहे. यासाठी गेल्या दोन वर्षांपासुन लिंगायत समाज सतत आंदोलन करुन रस्त्याची मागणी करत आहे. यापुर्वीही दि.४ मार्च २०१९ रोजी लिंगायत समाजाच्या वतीने चक्क तहसील कार्यालयात अभ्यंगत कक्षात दोन तास प्रेत ठेवण्यात आले होते. आजपर्यंत प्रशासनाकडून कारवाई झाली नसल्याने आजही तहसील आवारात प्रेत यात्रा नेण्यात आली. नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी आंदोलकांची समज काढून प्रकरण तुर्त शांत करत येत्या ३१ आगस्ट पर्यंत स्मशानभुमीचा रस्ता मोकळा करुन देण्याचे आश्वासन दिले. यानंतर इतर रस्त्याने प्रेतयात्रा नेत अंत्यविधी करण्यात आला.