21 वर्षांनंतर भारताला मिळाला हा ‘सन्मान’… भारताच्या हरनाज संधूची बाजी.

नवी दिल्ली दि.13 डिसेंबर – सौंदर्यस्पर्धेत अत्यंत प्रतिष्ठिचा समजला जाणारा ‘मिस युनिव्हर्स’ (Miss Universe) हा किताब भारताच्या हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) पटकावला आहे. इस्रायलमध्ये ही सौंदर्यस्पर्धा पार पडली. तब्बल 21 वर्षानंतर या स्पर्धेत भारताने बाजी मारली आहे.
(After 21 years, India got this ‘honor’ … India’s Harnaj Sandhu’s bet.)
भारताच्या अभिनेत्री लारा दत्ताने 2000 मध्ये हा किताब पटकावला होता. त्यानंतर तब्बल 21 वर्षांनी मेक्सिकोची माजी मिस युनिव्हर्स 2020 अँड्रिया मेझा हिने हरनाजला आपला मुकूट दिला. हरनाजने 21 वर्षांनी ‘मिस युनिव्हर्स’चा मुकूट भारतात (India) आणला. हरनाजने पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना मागे टाकत ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला.
या सौंदर्यस्पर्धेत पॅराग्वे (Paraguay) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर विजयी ठरले. मेक्सिकोची माजी मिस युनिव्हर्स 2020 अँड्रिया मेझा हिने हरनाजला आपला मुकूट दिला. यावेळी हरनाजला आपले आनंदाश्रू आवरता आले नाही.
असे दिले प्रश्नाचे उत्तर...
“आजच्या काळात येणाऱ्या तणावांना कसं सामोरं जावं याविषयी तुम्ही तरुण महिलांना काय सल्ला द्याल”, असा प्रश्न टॉप 3 राऊंडमध्ये विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना हरनाज म्हणाली, “स्वत:वर अतिविश्वास ठेवणं हा आजच्या तरुणाईवरील सर्वांत मोठा दबाव आहे. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात याची जाणीवच तुम्हाला सुंदर बनवते. इतरांशी स्वतःची तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडणाऱ्या अधिक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण बोलुयात. तुम्ही समोर या, इतरांशी बोला.. कारण तुमच्या आयुष्याला घडवणारे तुम्हीच आहात. तुम्हीच स्वत:चा आवाज आहात. मला माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच आजा मी याठिकाणी उभी आहे.”
हरनाजने 2017 मध्ये ‘टाइम्स फ्रेश फेस’ या सौंदर्यस्पर्धेतून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. 21 वर्षीय हरनाज सध्या पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तिने ‘फेमिना मिस इंडिया पंजाब 2019’चा किताबसुद्धा आपल्या नावे केला आहे. हरनाजने काही पंजाबी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.