बीड दि. 28 ऑगस्ट – बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) येथील अंबा सहकारी साखर कारखान्याची 25 एक्कर जमीन शेतकऱ्यांच्या एफ.आर.पी. ची रक्कम देण्यासाठी विकल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे सदरील जमीन विकण्यास साखर आयुक्तांनी (Sugar Commissioner) परवानगी दिली आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांचे एफ.आर.पी. (FRP) चे पैसे का दिले नाहीत? असा प्रश्न शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी विचारला आहे.
(Amba Co-operative Sugar Factory sold 25 acres of land; Suspicion of financial malpractice to the farmers’ association.)
शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देण्यासाठी कारखान्याची 25 एकर जमीन विक्री करण्याचा प्रकार साखर कारखानदारीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे. अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याला 7 जून 2021 रोजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अटी व शर्ती घालून शेतकऱ्यांच्या एफ.आर.पी. ची रक्कम देण्यासाठी 25 एकर जमीन विकण्याची परवानगी दिली होती.
या कारखान्यात उसापासून केवळ साखर बनली असं नाही तर वेगवेगळे उप पदार्थ देखील बनले आहेत. असं असूनही शेतकऱ्यांचे पैसे का दिले नाहीत? असा प्रश्न शेतकरी संघटनेचे (Shetkari Sanghatna) कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी विचारला आहे. कारखान्याच्या जमीन विक्रीचा व्यवहार संशयास्पद असून यामध्ये आर्थिक गैर व्यवहार झाल्याचा संशय आहे, म्हणून हा आदेश मागे घ्यावा अशी मागणीही आपेट यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या एफ.आर.पी.चे पैसे व्याजासह न मिळाल्यामुळे साखर आयुक्तांनी घातलेल्या अटींचे अंबासाखरने उल्लंघन केल्याचं स्पष्ट होतं आहे. त्यामुळे संबंधित प्रकाराची गंभीर दखल घेऊन साखर आयुक्तांनी जमीन विक्रीला तातडीनं स्थगिती द्यावी. अशी मागणी शेतकरी संघटनेचे भाई मोहन गुंड यांनी केली आहे.
शेतकऱ्याच्या एफआरपीचे पैसे देण्यासाठी आम्ही पंचवीस एकर जमीन विकली आहे. मात्र त्यातील एक रुपयाही इकडे तिकडे गेलेला नाही. यातून शेतकऱ्यांच्या उसाची थकीत बिलं देण्यात आली आहेत. तसेच हा व्यवहार पारदर्शक झाला असून कारखान्यावर प्रशासक नेमल्यानंतर कारखान्याला कुठल्याही बँकेनं कर्ज दिलं नाही. त्यामुळे सभासदांच्या ठेवीमधून हा कारखाना चालू ठेवला आहे. यामधून शेतकऱ्यांना फायदा व्हावा हाच मुख्य उद्देश असल्याचं भाजपा (BJP) नेते आणि अंबा साखरचे चेअरमन रमेश आडसकर (Ramesh Adaskar) यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं आहे.
अंबा सहकारी साखर कारखान्याची 25 एक्कर जमीन शेतकऱ्यांच्या एफ.आर.पी. ची रक्कम देण्यासाठी विकल्याचे वृत्त आघाडीच्या दैनिकांच्या अॉनलाईन आवृत्तीत (Online edition) प्रकाशित झाले आहे. यामुळे थेट जमिनी विकण्याचा चुकीचा पायंडा पडत असल्यानं आश्चर्य व्यक्त करत चिंता व्यक्त केली जात आहे.