तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडुन मृत्यु; अंबाजोगाईतील घटना.

अंबाजोगाई दि.21 मे – शुक्रवारी दुपारी लाल नगर विभागातील पाझर तलावात पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय शेख अब्रार शेख चॉंद या तरुणाचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला. तब्बल चोविस तासानंतर आज दुपारी एकच्या सुमारास सदर तरुणाचे प्रेत काढण्यात रेस्क्यू पथकाला यश आले.
लाल नगर विभागात राहणारा शेख अब्रार हा तरुण शुक्रवारी दुपारी लाल नगर वस्ती पलिकडे असलेल्या पाझर तलावात पोहणे शिकण्यासाठी म्हणून गेला होता. पोहणे शिकण्यासाठी तलावात उतरल्यानंतर अचानक तो पाण्यात बुडाला. सदरील घटना समजताच लाल नगर विभागातील रहिवासी व या विभागातील माजी नगरसेवक त्याच्या शोधकार्यासाठी सदरील पाझर तलावात गेले. अनेकांनी तलावात उतरुन शेख अब्रार याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र नागरीकांना यात यश आले नाही. यातच जोराचा वादळी वारा व पाऊस यामुळे अडथळा निर्माण झाला आणि शोधकार्य थांबवावे लागले.
सदरील घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी परळी नगर परिषदेच्या रेस्क्यु टीमला बोलावण्याचा निर्णय घेतला व रेस्क्यु टीमने शनिवारी सकाळ पासून सदरील पाझर तलावात अब्रार चे शोधकार्य सुरु केले. प्राथमिक प्रयत्न करुन ही अब्रार सापडत नसल्यामुळे यंत्राद्वारे तलावातील अनेक ठिकाणी हवेचे प्रेशर सोडुन तलावातील पाणी ढवळण्यास सुरुवात केली असता अब्रार पार्थिव वर आले. अब्रार चे पार्थिव त्यांच्या घरातील मंडळीं व नातेवाईकांकडे सोपवण्यात आले.
सदरील शोधकार्य सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होते. लाल नगर वस्ती पलिकडे असणा-या या पाझर तलावात यापुर्वीही अनेकजणांना जलसमाधी मिळाली असल्याची चर्चा या निमित्ताने पुन्हा एकदा होत आहे. तर तरुणाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून झालेल्या दिरंगाईबद्दलही अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे.
( A young man who went for a swim in the lake drowned; Incidents in Ambajogai. )