BEED24

अंबाजोगाईत 30 हजारांची लाच घेणाऱ्या कार्यकारी अभियंत्यास पकडले.

अंबाजोगाई दि.22 जुन – प्रलंबित देयके अदा करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कार्यकारी अभियंत्यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेच्या ( ACB ) पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

संजयकुमार कोकणे असे लाच घेताना पकडलेल्या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी कार्यरत आहेत. त्यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत निधीतून केलेल्या विकासकामांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच एका कंत्राटदाराकडे मागणी केली होती.

याबाबत सदर कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचून बीडच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात लाच ( bribe ) स्वीकारताना कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईने अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली होती. सापळ्यात अडकलेल्या कार्यकारी अभियंत्यांची कारकीर्द सतत चर्चेचा विषय ठरली आहे.

पदभार स्वीकारताच सदर कार्यकारी अभियंत्याने ( executive engineer ) कार्यालयात गुत्तेदार पिस्तुलचा धाक दाखवून देयकावर सह्या घेतात, अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटदारांची दहशत असल्याचे चित्र दिसून आले होते. या प्रकरणानंतर कंत्राटदारांची अडवणूक करणे, अरेरावीची भाषा करणे असे अनेक प्रकार समोर आले होते. अशा प्रकारे कोकणे यांनी पदभार घेतल्यापासूनच त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे.

( An executive engineer was caught taking a bribe of Rs 30,000 in Ambajogai. )

Exit mobile version