बीड जिल्ह्यात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची होणार ॲन्टीजन चाचणी; न्यायालयाच्या निर्देशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.

बीड दि.30 एप्रिल – उच्च न्यायालयाच्या (High court) औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशानूसार लॉकडाऊन काळात बाहेर पडताना घ्यावयाची काळजीसह प्रशासनाने कोणती दक्षता घ्यावी व कार्यवाही करावी याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात आदेशाचा भंग करणाऱ्या व विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांची ॲन्टीजन चाचणी (Antigen test) करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना दिल्याचे निर्देशात समावेश आहे.
(Antigen testing to be conducted in Beed district; Collector’s order for implementation of court directions.)
मुंबई उच्च न्यायालयाच्या (High court) औरंगाबाद खंडपिठात कोविड-19 संदर्भात दाखल फौजदारी सु-मोटो जनहित याचिकेची दि. 26 एप्रिल रोजी सुनावणी होवुन न्यायालयाने आदेश निर्गमीत केले. या आदेशात नागरिकांना लॉकडाऊनच्या कालावधीतील निर्बंधाच्या अनूशंगाने नागरिकांना बाहेर पडताना घ्यावयाची काळजी त्याचबरोबर प्रशासनाने घ्यायवयाची दक्षता आणि करावयाची कारवाई बाबत सविस्तर निर्देश दिले आहेत. सदरील निर्देशाचे पालन करण्याचे आदेश बीड जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी काढले आहेत.
या निर्देशात समाविष्ट बाबी.
1. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 11 या कालावधी व्यतिरिक्त अत्यावश्यक कामासाठी वाहनाद्वारे बाहेर जायचे असल्यास आधार कार्ड जवळ ठेवणे अनिवार्य. नसल्यास कारवाईस पात्र. ॲम्ब्युलंस कर्मचारी व रुग्णास सुट.
2. सर्व डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही आधार जवळ ठेवणे अनिवार्य.
3. हेल्मेटचा वापर अनिवार्य. यामुळे डोळ्यांना कोरोना विषाणू संसर्ग होणार नाही.
4. घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस मास्क बंधनकारक. नाक तोंडावर व्यवस्थित मास्क नसल्यास सुपर स्प्रेडर ठरवून कारवाईस पात्र.
5. वाहतूक पोलिस निर्बंधाचा भंग करणाऱ्या व्यक्तीस आधारकार्ड चा फोटो घेवून कारवाई करु शकतील किंवा त्याची ॲन्टीजन तपासणी (Antigen test) करु शकतील.
6. लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांना कसलीही सुट नसणार. या लोकांनी निर्बंध मोडणाऱ्या व्यक्तीस सोडण्यासाठी कसलाही दबाव टाकण्याचा प्रयत्न करु नये.
7. सदरील सर्व निर्देश हे कर्तव्यावर नसलेल्या लोक सेवकांवरही लागू असणार आहेत.
या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी आज काढले आहेत.