कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची प्रकृती बिघडली; सर्व कार्यक्रम रद्द.

बीड दि.25 मे – प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची प्रकृती बिघडलेली असून येत्या 30 मे पर्यंतचे त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत. इंदुरीकर महाराजांना डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, अशा आशयाचं पत्र खुद्द निवृत्ती महाराज देशमुख यांच्याकन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
“लवकरच बरा होऊन मी आपण सर्वांच्या सेवेत येणार इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत, असे देखील इंदुरीकर महाराजांनी सांगितले आहे. आपल्याला होणार्या गैरसोयीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,” तसेच “उपचारानंतर पुन्हा आपल्या सेवेत पूर्व नियोजित कार्यक्रम पार पडतील. आपल्या सर्वांचे आशिर्वाद पाठीशी आहेत. असेच प्रेम कायम लाभावे ही अपेक्षा” असे महाराजांनी पत्रात म्हटलं आहे.
गेल्याच महिन्यात दि.14 एप्रिल रोजी इंदुरीकर महाराजांच्या वाहनाचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांना कोणतीही इजा झाली नसलीतरी ते अपघातातून थोडक्यात बचावले होते. इंदुरीकर महाराज हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करत होते. परतूर शहरात रात्री कीर्तनासाठी निघाले असताना हा अपघात झाला होता.
लाकडं वाहून नेणाऱ्या एका ट्रॉलीला इंदुरीकर महाराज यांची स्कॉर्पिओ धडकल्याने हा अपघात झाला होता. या अपघातात इंदुरीकर महाराज यांचे चालक जखमी झाल्याने पोलिसांनी त्वरित चालकाला परतूर मधील अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. सत्यानंद कराड यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर इंदुरीकर महाराज यांना पोलिसांनी दुसऱ्या वाहनाने कीर्तनासाठी रवाना केले.
गेल्याकाही दिवसांत इंदूरीकर महाराज आपल्या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांनी आपल्या कीर्तनाचे व्हिडीओ करणाऱ्यावर केलेले वक्तव्य चांगलेच गाजले होते. तत्पुर्वी कोरोना लसीबाबतचे त्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. तसेच अपत्यप्राप्तीच्या वक्तव्यामुळेही चर्चा झाली होती. सतत चर्चेत असणारे अन महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या इंदूरीकर महाराजांची प्रकृती अस्वस्थ झाली आहे.
( Kirtankar Indurikar Maharaj’s health deteriorated; All events canceled. )