मुंबईत कोविड रुग्णालयात अग्नितांडव; दहा जणांचा मृत्यू … अजून आग विझवण्यात अपयश.

मुंबई दि.26 मार्च- मुंबईत भांडुपमध्ये एका मॉलमध्ये असलेल्या सनराईज रुग्णालयाला (Sunrise Hospital) भीषण आग लागली असून नऊ तासानंतरही आग विझवण्याचा प्रयत्न सुरुच आहे. कोरोना रुग्ण दाखल असणाऱ्या या रुग्णालयात लागलेल्या आगीत दोघांचा रात्रीच मृत्यू झाला होता असून 6 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र आत्ताच आलेल्या माहितीनुसार या आगीत दहा कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 76 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. यात 73 कोरोना रुग्णांची रुग्णालयातून सुटका करण्यात आली आहे. ड्रीम्स मॉलमध्ये (Dreams Mall) असणाऱ्या सनराईज रुग्णालयात (Sunrise Hospital) लागलेल्या आगीनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही गंभीर बाब असल्याचं म्हटलं आहे. तर भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी मॉल चालकावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. काही वेळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घटनास्थळी जाणार असल्याचे वृत्त आहे.
(Fire at Kovid Hospital in Mumbai; Ten died … still failing to put out the fire.)
भांडुपमध्ये रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ड्रीम्स मॉल (Dreams Mall) सनराइज हॉस्पिटलमध्ये ही आग लागली. मुंबईत एकीकडे कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत असतानाच आग लागल्याची ही घटना घडली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी घटनास्थळी भेट दिली असून “पहिल्यांदाच मी मॉलमध्ये रुग्णालय पाहत आहे. ही अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया दिली. या रुग्णालयात सात रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. 70 रुग्णांना इतर रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे. आगीचं कारण जाणून घेण्यासाठी तपास केला जाईल,” असं किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी म्हटलं आहे.
आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या (Fire brigade) 22 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. “आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. रात्री 12.30 वाजता रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या (Fire brigade) गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत. पोलीस अधिकारी प्रशांत कदम घटनास्थळी तळ ठोकून आहेत. 73 पैकी 30 रुग्णांना मुलुंडच्या जम्बो सेंटरमध्ये हलवण्यात आले असून तिघांना फोर्टीस रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं आहे. याशिवाय इतर रुग्ण हॉस्पिटलच्या इतर वॉर्डमध्ये दाखल आहेत अशी माहिती एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली आहे.
दरम्यान, आज सकाळी भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या (Kirit Somaiya) घटनास्थळी दाखल झाले. मॉलमध्ये चालणाऱ्या रुग्णालयाकडे एनओसी नसल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमासमोर बोलताना, हा मॉल म्हणजे घोटाळ्याचा महाल असून आगीला जबाबदार मॉल चालकाला धरावे व त्यांच्या वर गुन्हे नोंदवावी अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली. अगदी काही वेळात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घटनास्थळी दाखल होणार आहेत. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नरनाळे यांनी दोषीवर गुन्हे नोंदवणार असल्याचे माध्यमासमोर सांगितले.