संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे एसटी बससाठी मोठा निर्णय; पहा काय होणार बदल….

मुंबई दि.31 जुलै – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती अद्याप कायम असून तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना काळात गेल्या दिड वर्षात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला कोट्यवधीचे नुकसान सोसावे लागले. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटेचा अनुभव पाहता महामंडळाकडून आता एसटी बससाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
(Big decision for ST bus due to possible third wave; See what will change ….)
तिसरी लाट (Third wave) येण्यापूर्वीच त्याच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) तयारी सुरु केली आहे. अशातच आता एमएसआरटीसी यांच्याकडून एसटी बससाठी (ST Bus) एक मोठा निर्णय घेत एसटी बस वर अँटिमायक्रोबियल केमिकलचे कोटिंग (Antimicrobial chemical coating) केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये जवळजवळ 10 हजार एसटी बसचा समावेश असणार आहे.
या विशेष रसायनाची फवारणी एसटी बसच्या बाहेर आणि आतमधू केली जाणार आहे. यामुळे बसमध्ये कोणत्याही प्रकारचे विषाणू टिकून राहणार नाहीत असे सांगितले जात आहे. अँटिमायक्रोबिल केमिकल सारख्या रसायनांचा वापर कार्यालये किंवा एअरलाईन्समध्ये फवारणीसाठी केला जातो.
एमएसआरटीसीचे उपाध्यक्ष शेखर चेन्ने यांनी म्हटले की, कोरोनाच्या काळात नागरिकांकडून सार्वजनिक वाहतूकीचा वापर करण्याकडे पाठ फिरवली जात आहे. मात्र बसवर जर अँटिमायक्रोबिल केमिकल सारख्या रसायनांची फवारणी केल्यास नागरिकांमधील कोरोनासंदर्भातील भीती काहीशा प्रमाणात दूर होईल. यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेत प्रवाशांचा प्रवास सुकर होवून महामंडळाला आर्थिक फटका बसणार नसल्याचे सांगितले जात आहे.