कोरोंना विशेष

कोवैक्झिन लसीबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय; 45 वर्षांवरील लाभार्थ्यांना मिळणार दुसरा डोस.

बीड दि.10 मे – 45 वर्षांपुढील लोकांसाठी कोवैक्झिन (Covaxin) लसीचा केंद्राकडून पुरवठा होत नसल्याने शेकडो लोक दुसऱ्या डोसपासून वंचित असल्याची बातमी बीड24 मधून प्रकाशित झाल्यानंतर राज्य शासनाने तात्काळ याची दखल घेत सर्व जिल्ह्यांना नवीन आदेश देत 18 ते 44 वयोगटासाठी राज्य शासनाने उपलब्ध केलेल्या कोवैक्झिन लसीच्या शिल्लक डोस पैकी 45 वर्षावरील दुसऱ्या डोससाठी वापर करण्याच्या सुचना केल्या आहेत. यासंदर्भाचे पत्र रात्री काढण्यात आले. यामुळे कोवैक्झिन लसीच्या दुसऱ्या डोससाठी प्रतिक्षा करणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

(Big decision of state government regarding covacin vaccine; Beneficiaries above 45 years of age will get a second dose.)

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. वाढती कोरोनाची रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच लसीकरण (Vaccination) मोहीमही मोठ्या प्रमाणात राज्यभरात सुरूवात केली आहे. राज्य शासनाकडून राज्यभर वेगवेगळ्या जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटासाठी सुमारे 4 लाख 79 हजार 150 डोस पुरवण्यात आली आहेत.

यातच कोवैक्झिन (Covaxin) लसीचा दुसरा डोस देय असलेल्या लोकांची संख्या 5 लाखाच्यावर पोहोचली आहे. 18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरु असताना मात्र 45 च्या वरील वयोगटातील कोवैक्झिनच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण (Vaccination) खोळंबले होते. यामुळे राज्य शासनाने मोठा निर्णय घेत याबाबतच्या स्पष्ट सुचना दिल्या आहेत.

राज्य स्तरावरुन राज्याच्या निधीतून पुरवठा केलेल्या 4 लाख 79 हजार 150 कोवैक्झिन डोसेस पैकी काही डोसेस काही जिल्ह्यांत उपलब्ध आहेत. या शिल्लक असलेल्या कोवैक्झिन डोसचा वापर त्या त्या जिल्ह्यातील कोवैक्झिन लसीचा दुसरा डोस देय असलेल्या 45 वर्षावरील लाभार्थ्यांसाठी वापर करण्यात यावा अशी सुचना करण्यात आली आहे.

सध्या पुरवठा करण्यात आलेल्या व शिल्लक असलेल्या कोवैक्झिन डोसचा वापर कोणत्याही वयोगटातील पहिल्या डोससाठी करण्यात येवू नये असेही आदेशात म्हटले आहे. या आदेशाची अमलबजावणी दि.11 मे पासून करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. अशा आशयाचे पत्र राज्य कुटूंब कल्याण कार्यालय पुणे येथून अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा डॉ. अर्चना पाटील यांनी काढले आहे.

मात्र दि.11 व 12 मे रोजीसाठी 18 ते 44 वयोगटातील लोकांसाठी अॉनलाईन नोंदणी (Online registration) झाली असल्यामुळे वरील आदेशामुळे आरोग्य प्रशासनासमोर पेच निर्माण होणार आहे. सदरील आदेशाने 45 वर्षावरील दुसरा डोस देय असणाऱ्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार असला तरी 18 ते 44 वयोगटातील लसीकरण कसे करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, अद्याप कोणत्याही जिल्हा प्रशासनाने अद्याप याबाबत निर्णय जाहिर केलेला नाही. दुसरीकडे लसीकरणासाठी आवश्यक कोविन ॲपमध्ये अचानक तांत्रिक अडचण निर्माण होवून अॉनलाईन नोंदणीस (Online registration) अडथळा येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यामुळे आज होणाऱ्या लसीकरण बाबत स्थानिक जिल्हा प्रशासन नवीन आदेशानूसार बदल करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धारुर येथे डॉ. चेतन आदमाने यांनी या परिस्थितीमुळे  आज कोणतेही लसीकरण होणार नसल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!