उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकरणात मोठा खुलासा; हा तर अपप्रचार…

मुंबई दि.3 नोव्हेंबर – उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने (Income Tax Department) टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. अशी माहिती देत प्रसिद्धीमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात व कुठलाही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे करण्यात आले आहे.
(Big revelation in the case of Deputy Chief Minister Ajit Pawar; This is propaganda …)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
आयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात व कुठलाही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे करण्यात आले आहे.
अजित पवारांचा संबंध नाही – नवाब मलिक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, यात कोणतेही तथ्य नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला. कोणतीही संपत्ती ही बेनामी नसते. त्याचा कुणी तरी मालक असतोच. त्यामुळे दुसऱ्या कुणाची तरी संपत्ती जप्त करून त्याला अजित पवारांचे नाव देणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.