अंबाजोगाईत तरुणाची निर्घूण हत्या… तीन संशयित ताब्यात… ग्रामस्थांचा ठिय्या.

अंबाजोगाई दि.2 (प्रतिनिधी):- अंबेजोगाई शहरानजीक असलेल्या मोरेवाडी येथे दि.1 मार्चच्या रात्री 20 वर्षीय तरुणाची तलवारीने वार करत निर्घूण हत्या (Murder) करण्यात आली. या घटनेने अंबाजोगाईत एकच खळबळजनक उडाली. घटनेचे गांभिर्य पाहता पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे वेगात फिरवली असून रात्री तीन संशयितांना ताब्यात घेतले. मात्र मोरेवाडी ग्रामस्थांनी आणखी दोन आरोपींना ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यात (Police Station) ठिय्या आंदोलन केले.
(Young man brutally murdered by sword in Ambajogai … Three suspects in custody)
अंबेजोगाई पासून जवळच असलेल्या मोरेवाडी येथील गणेश सुंदर मोरे हा 20 वर्षीय तरुण सांयकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गावातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या भेळ च्या गाड्यावर भेळ खात होता. यावेळी अचानक पाठीमागून येवून दोन तरुणांनी तलवारीने गणेशवर हल्ला चढवला. दोन्ही हातावर आणि तोंडावर सपासप वार केल्याने गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना जुन्या भांडणातून घडली आहे.
अगदी सिनेस्टाईल घडलेल्या या हत्येमुळे (Murder) अंबाजोगाईसह परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचे गांभिर्य पाहता पोलीसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पोलीसांनी रात्री तीन तरुणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली. मात्र याप्रकरणी आणखी दोन आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी करत मोरेवाडी ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात (Police Station) ठिय्या आंदोलन केले. यावेळी मयत तरुणाचे पार्थिव ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. अतिरिक्त पोलीस अधिक्षक स्वाती भोर या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ग्रामस्थांशी संवाद साधून दोन दिवसात इतर आरोपी ताब्यात घेण्यात येतील असे आश्वासन पोलिसांनी (Police) दिले.