
किल्लेधारुर दि.16 सप्टेंबर – Chief_officer धारुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश गायकवाड यांची परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सहआयुक्त म्हणून पदोन्नतीसह प्रशासकीय बदली झाल्याचे आदेश प्राप्त झाले.
धारुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश गायकवाड यांची शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब संवर्गातून गट अ संवर्गात निव्वळ तदर्थ स्वरुपात नुकतीच पदोन्नती झाली होती. मुख्याधिकारी महेश गायकवाड यांची दि.15 सप्टेंबर रोजी परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून पदोन्नतीनुसार बदली झाल्याचे आदेश शासनाचे अवर सचिव अ.का. लक्कस यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झाले. गेल्या दोन वर्षांपासून गायकवाड हे धारुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असून शहरातील अनेक विकासकामे पुर्ण करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. शहरातील मुख्य रस्त्याचे काम, कुंडलिका पाणी पुरवठा योजनेच्या कामासह नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्पर असल्याने त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या पदोन्नतीनंतर झालेल्या प्रशासकीय बदलीनंतर सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



