स्वस्त धान्य दुकान प्रकरणी तक्रारकर्त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

किल्लेधारूर दि.४(वार्ताहर) तालुक्यातील उमरेवाडी येथील ग्रामस्थांनी येथील स्वस्त धान्य दूकानाबाबत केलेल्या तक्रारीनंतर तहसील कार्यालयाच्या अहवालावर नाखुषी दाखवत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतीत साकडे घातले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील उमरेवाडी येथील ग्रामस्थांनी स्वस्त धान्य दुकानदार के.एस. राठोड यांच्या बाबतीत तहसील कार्यालयात तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेवून दि.२७ एप्रिल रोजी तहसीलदारांच्या पथकाने सदरील दुकानाची तपासणी करुन पंचनामा केला. याबाबतीतचा अहवाल वरिष्ठांना पाठवत दुकानदाराकडून त्रुटी पुर्ण करण्याचे हमीपत्र घेतले होते. मात्र तक्रारकर्ते अनंत महादेव दहिफळे व ग्रामस्थ यांनी तहसील पथकाच्या पंचनामा कारवाईवर आक्षेप घेत मुळ तक्रारी कडे दुर्लक्ष झाल्याचे सांगत जिल्हाधिकारी बीड यांचेकडे निवेदन दिले आहे. निवेदनात मुळ तक्रारींचा पाडा वाचत जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतीत फेर चौकशी समिती मार्फत करण्याची व दुकान परवाना निलंबित करण्याची मागणी केली आहे.