लातूरमध्ये नवरदेवासह 23 वऱ्हाड्यांना कोरोनाची लागण; धार्मिक कार्यक्रमातही आढळले 13 पॉझिटीव्ह

लातूर दि.5 मार्च – लातूरमध्ये (Latur) एका लग्नात नवरदेव आणि त्याच्या आईसह वऱ्हाड्यातील 23 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर लातूरमधीलच अहमदपूर तालुक्यातील चिखली येथे एका धार्मिक कार्यक्रमामध्ये एकत्र आलेल्या लोकांपैकी 13 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आता लग्न समारंभ आणि धार्मिक कार्यक्रम कोरोनाचा सुपर स्प्रेडस ठरत असल्याचे दिसून येत आहे.
(Coronavirus infection of 23 brides including Navradeva in Latur; Also found 13 positive in religious program)
लातूर (Latur) जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढत असल्याचे दिसुन येत आहे. अहमदपूर तालुक्यातील वऱ्हाड लग्नासाठी लातूरला आले होते. या वऱ्हाड्यातील नवरदेव व नवरदेवाच्या आईसह तब्बल 23 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Corona Positive) आला आहे. तर अहमदपूर तालुक्यातील चिखली गावातील एका धार्मिक कार्यक्रमामुळे एकत्र आलेल्या तब्बल 13 जणांना कोरोनाची लागण झाली.
सार्वजनिक कार्यक्रमात लोकांची उपस्थित कमी असावी. शिवाय कोरोनाचे त्रिसुत्रीचे पालन करावे, असे प्रशासनाकडून सातत्याने सांगितले जात आहे. तरी देखील लोकं प्रशासनाने दिलेले आदेश आणि कोरोनाचे नियम धाब्यावर बसवताना दिसत आहेत. लातूरमध्ये 48 कोविड केअर सेंटर (Covid care center) होते, त्याच्यापैकी फक्त लातूर शहरातील कोविड केअर सेंटर सुरू आहे. बाकीचे सर्व कोविड सेंटर रुग्ण नसल्यामुळे बंद करण्यात आले होते. मात्र एकाच दिवसात 36 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यामुळे अहमदपूर मधील कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.
त्यामुळे लातूरमधील कोरोनाबाधितांची (Corona Positive) संख्येत आता मोठी भर पडली आहे. या कारणामुळे आता अहमदपूरमधील कोविड केअर सेंटर (Covid care center) देखील सुरू करण्यात आले आहे. अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच लग्न, धार्मिक कार्यक्रम, आंदोलने व अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमास मर्यादा घातलेल्या आहेत. मात्र लोक सध्या या सर्व नियमांची पायमल्ली करुन सर्रास गर्दी करत असल्याचे दिसत आहेत.