सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात बांधिलकी जोपासणाऱ्या संतोष स्वामींचा विशेष कार्यगौरव…
अ.भा.वीरशैव लिंगायत महासंघाच्या पुरस्कारांची घोषणा

बीड : दि.२२- अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या नववा वर्धापनदिन कोल्हापूर (Kolhapur) येथे दि.६ व ७ फेब्रुवारी २०२१ रोजी साजरा करण्यात येणार असून या अनुषंगाने वीरशैव समाजाच्या उत्कर्षासाठी वाहुून घेतलेल्या अनेक मान्यवरांचा विशेष सत्कार, त्याच बरोबर विविध क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविणार्या वीरशैव समाजातील ९ मान्यवरांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार असून यात बीड (Beed) जिल्ह्यातील संतोष स्वामी यांचाही विशेष गौरव करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे प्रवक्ते डॉ.विजय जंगम स्वामी यांनी पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना दिली.
महासंघाच्या वतीने दिल्या जाणार्या या राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी मराठवाड्यातील चौघांची निवड करण्यात आली असून त्यात अहमदपूरच्या भक्तिस्थळाचे अध्यक्ष आणि प्रशासकीय अधिकारी रामदास पाटील, औरंगाबादच्या शासकीय कर्करोग रूग्णालयाचे डॉ.महेश रेवाडकर, पत्रकार परमेश्वर लांडगे आणि समाजासाठी अहोरात्र झटत सामाजिक, वैद्यकीय मदतीसाठी तत्पर सेवा करणारे बीडच्या माजलगाव तालुक्यातील पत्रकार संतोष स्वामी विशेष कार्यगौरव या सोहळ्यात करण्यात येणार आहे. रामदास पाटील यांना धर्मरक्षकवीर, डॉ. महेश रेवाडकर यांना वैद्यकिय सेवारत्न, परमेश्वर लांडगे यांना साहित्यरत्न तर संतोष स्वामी (Santosh Swami) यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या बरोबरच राज्यातील आणखी ६ जणांना समाजभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार असून त्यामध्ये मनोहर भोळे, सुनिल गाताडे, किशोर बाळासाहेब पाटील, संतोष जंगम, बाळकृष्ण सांगवडेकर, सागर माळी यांचा समावेश आहे. दि.६ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे महासंघाच्या ९ वर्धापनदिनी निमंत्रित धर्मगुरूंच्या सानिध्यामध्ये उपस्थित मान्यवरांच्याच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील संतोष बाबुराव स्वामी हे अनेक वर्षांपासुन पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात संतोष स्वामी यांचे भरीव योगदान आहे. गेल्या काळात मुख्यमंत्री आरोग्य कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या माध्यमातून राज्यभरातील गरजु आजारी वीरशैव समाज बांधवांसाठी संतोष स्वामी यांनी मदत केली आहे. सकारात्मक पत्रकारिता हे उद्दिष्ट जोपासत गावासह तालुक्यात आदर्श पत्रकार म्हणून संतोष स्वामी (Santosh Swami) यांची ओळख आहे. २०२१ मध्ये होणार्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर महासंघाच्या या वर्धापनदिनाकडे औत्सूक्याने पाहिले जात आहे. या बाबत महासंघाची भूमिका मांडतांना प्रवक्ते डॉ.विजय जंगम म्हणाले, वीरशैव समाज हा हिन्दू धर्माचाच एक भाग असल्याने हिन्दू पासून त्याला वेगळे करता येत नाही. मात्र, राजकीय हेतूने प्रेरित झालेली समाजातील काही मंडळी वेगळ्या लिंगायत धर्माची मागणी करीत असून येत्या जनगणनेमध्ये धर्माच्या रकान्यात आपला धर्म लिंगायत असे लिहिण्यासाठी समाजाला सांगून मोठ्या प्रमाणात दिशाभूल करीत आहेत. वीरशैव समाजाच्या कोणत्याही घटकाने या अफवेला बळी पडुन आपला धर्म सोडू नये. जनगणनेचा फॉर्म भरतांना धर्माच्या रकान्यात आपला धर्म हिन्दू असल्याचेच नमूद करावे. हिन्दू धर्म आहे आणि वीरशैव-लिंगायत ही आचरण पध्दती आहे. त्यामुळे याकडे समाज बांधवांनी गंभीरतेने पाहिले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत महासंघाचे अध्यक्ष भिवलिंग जंगम, महासचिव अजित स्वामी, कोषाध्यक्ष प्रकाश जंगम, सचिव वैजनाथ स्वामी, महिला आघाडी प्रमुख विद्याताई जंगम यांच्यासह अनेक पदाधिकार्यांची उपस्थिती होती. दि.६ फेब्रुवारी ला कोल्हापूर (Kolhapur) येथे आयोजित वर्धापनदिन व सन्मान सोहळ्यासाठी समस्त वीरशैव समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय वीरशैव महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.