केज दि.31 जानेवारी – केज तालुक्यात अपहरण करुन जीवे मारण्याची धमकी देत जातिवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली. या प्रकरणात युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.
(Crime of kidnapping and atrocity in Kaij taluka; See what’s the type …)
ऊस तोडणीला मजूर पुरविण्यासाठी पाच लाख रुपये घेऊनही मजूर न पाठविल्यामुळे ढाकेफळ (ता. केज) येथील मुकादमास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत जातिवाचक शिवीगाळ करून त्याचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणी अपहृत मुकादमाच्या पत्नीच्या फिर्यादीवरून युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात कोल्हापूरच्या (Kolhapur) चौघांविरुद्ध अपहरण व ॲट्रॉसिटीचा (atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला.
केज (Kaij) तालुक्यातील ढाकेफळ येथील पांडुरंग घाडगे यांना उदय पाटील, स्वप्नील पाटील आणि त्यांचे सोबतचे इतर दोघांनी ऊस तोडणीसाठी मजूर पुरविण्यास पाच लाख रुपये दिले होते. मात्र, पैसे घेऊनही घाडगे याने ऊस तोडणीसाठी मजूर पाठविले नाही. त्यामुळे पैसे का परत दिले नाही, म्हणून लाथा-बुक्क्याने मारहाण करत त्यांना गाडीत बसवून अपहरण केले व जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
या प्रकरणी पांडुरंग घाडगे यांची पत्नी मैनाबाई घाडगे यांच्या तक्रारीवरून (Complaint) युसूफवडगाव पोलिस ठाण्यात (Police Station) उदय पाटील, स्वप्नील पाटील (दोघे, रा. कावणे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) आणि इतर दोघे अशा चार जणांविरुद्ध मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणे, अपहरण व अनुसूचित जातीजमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत (Pankaj Kumawat) हे करीत आहेत.