महाराष्ट्र

दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार, सुमारे ४३ लाख रोजगारनिर्मिती – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

66 / 100 SEO Score

मुंबई, दि. २३ :

daos investment in maharashtra दावोस (स्वित्झर्लंड) येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आतापर्यंत एकूण ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, त्यातून राज्यात सुमारे ४३ लाख युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी ठरलेला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, दावोसमध्ये एकूण ८१ करार झाले असून, त्यापैकी १६.६९ लाख कोटी रुपयांचे ५१ करार उद्योग क्षेत्रातील आहेत. ‘एमएमआरडीए’ अंतर्गत २४ करार असून त्यांची किंमत १९.४३ लाख कोटी रुपये आहे, तर सिडको अंतर्गत ६ करार १.१५ लाख कोटी रुपयांचे आहेत. एकूण गुंतवणुकीपैकी सरासरी ८० टक्के थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

मागील वर्षी दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये १५ लाख कोटींच्या सामंजस्य कराराची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी सुरू आहे. गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, रायगड आदी जिल्ह्यांत प्रत्यक्ष उद्योग उभे राहत असल्याचे उद्योग मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.

रायगड/पेण ग्रोथ सेंटर

दावोस दौऱ्यात ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, डिफेन्स, फार्मा अशा सर्व क्षेत्रांतील गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असून, तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरसाठी एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय ‘एमएमआर’ क्षेत्रात सुमारे २३ लाख कोटी, मल्टीपल लोकेशन्समध्ये ७.७२ लाख कोटी, कोकणात ३.१० लाख कोटी, नागपूरमध्ये १.९५ लाख कोटी, नाशिकमध्ये ३०,१०० कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये १७,७०० कोटी, पुण्यात ३,२५० कोटी आणि अमरावतीत १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल

परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे सांगताना उद्योगमंत्री डॉ.सामंत म्हणाले की, केंद्र शासनाच्या सर्वेक्षणानुसार मागील वर्षी महाराष्ट्रात १.६४ लाख कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणुकीची नोंद झाली आहे. त्याचबरोबर, उद्योग उभारणीसाठी किमान चार ते पाच वर्षांचा कालावधी लागतो, हे लक्षात घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दावोस दौऱ्यावरील खर्चाबाबतही लवकरच सविस्तर माहिती जनतेसमोर मांडणार असल्याचे सांगून, बल्क ड्रग पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला नसून तो रायगडमध्येच उभारला जात असल्याचे उद्योगमंत्री डॉ.सामंत यांनी स्पष्ट केले. उद्योग विभागावर होणारी तथ्यहीन टीका थेट उद्योजकांपर्यंत पोहोचते, त्यामुळे राज्यात नकारात्मक वातावरण निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!