Dharur प्रथमच धारुरचे हे उमेदवार विधानसभेच्या रिंगणात….

किल्लेधारुर दि.7 नोव्हेंबर – Dharur विधानसभा निवडणुकीत धारुर शहरातील एकापेक्षा जास्त उमेदवार पहिल्यांदाच रिंगणात असल्याचे दिसून येत आहे. अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या मतदान प्रक्रियेत आपल्या पदरात यश मिळवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकांचा ज्वर हळूहळू वाढत आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघात एकुण 34 उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रमुख पक्ष वगळता अपक्षांची संख्या अधिक आहे. होवू घातलेल्या 2024 च्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच धारुर शहरातील 3 तर तालुक्यातील 2 उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने शहरातील प्रसिद्ध उद्योजक व धनगर समाजाचे नेते माधवराव निर्मळ, यशंवतराव गायके, सादेक (इनामदार) मुलानी यांचा समावेश आहे. यशवंतराव गायके हे महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार आहेत. यापुर्वी चौसाळा मतदारसंघात शहरातील माजी नगराध्यक्ष कॕ. राजपालसिंह हजारी, पं.नरेंद्रप्रसाद शुक्ला या दिग्गजांसह सुर्यकांत महाजन यांनी वेगवेगळ्या पंचवार्षिक निवडणुकातून निवडणूक लढवली आहे. धारुर शहरातून आजपर्यंत तरी विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी कोणालाही मिळालेली नाही. शहराचे भुमिपुत्र जयसिंगराव गायकवाड यांनी औरंगाबाद येथून प्रथम विधान परिषद व तदनंतर बीड लोकसभेत विजय मिळवल्याचा इतिहास आहे. शहरातील माधवराव निर्मळ, यशवंतराव गायके, सादेक मुलानी यांच्यासह तालुक्यातील गांजपूर येथील प्रा. इश्वर मुंडे व मोहखेड येथील विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके हे महायुतीचे उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात आहेत.