धारुरचे न्यायालय, कोविड सेंटर व आय.टि.आय. दुर्गंधीच्या विळख्यात…. नागरिकांचे आरोग्य धोक्यात

किल्लेधारूर दि.७(वार्ताहर) येथील निसर्गरम्य ठिकाणी असलेले दिवाणी न्यायालय, कोविड सेंटर व आय.टि.आय. परिसर दुर्गंधीच्या विळख्यात सापडले असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहराच्या पश्चिमेस असलेल्या शासकीय जमिनित अनेक शासकीय कार्यालयांच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. यात पोलिस स्टेशनसह शासकीय गोदाम, तालुका क्रिडा प्रशिक्षण केंद्र, भुमिअभिलेख कार्यालय, वन परिक्षेत्र कार्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, मुलींचे शासकीय वस्तिगृहे (सध्या कोविड सेंटर) व न्यायालय यांचा समावेश आहे. न्यायालयाच्या अगदी समोरासमोर नगर परिषदेचे कचरा विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प डंपिंग ग्राऊंड आहे. यामुळे या परिसरात शहरातील कचरा टाकला जातो. याच ठिकाणी शहरातील जैविक कचरा ज्यात दवाखाने, स्लॉटर हाऊस येथून निघणारा कचरा टाकला जातो. परंतू अलिकडे शहरातील मांसविक्री करणाऱ्या व्यवसायिकाकडून घाण व शहरात मेलेली जनावरे नगर परिषदेकडून अगदी न्यायालयासमोर टाकली जात आहेत. याभागात मोकाट कुत्री व डुकरांची संख्याही यामुळे वाढली आहे. याभागात सकाळी व संध्याकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शिवाय कोविड सेंटरवर, न्यायालयात येणाऱ्या तसेच शहराचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र अंबाचोंडी मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. या दुर्गंधीचा त्रास होत असून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदरील प्रकाराला आळा घालून नगर परिषदेने उपाय व नियोजन करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.