धारुर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार- आमदार प्रकाश सोळंके.

किल्ले धारूर दि.19 एप्रिल – येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित आरोग्य मेळाव्याप्रसंगी आमदार प्रकाशदादा सोळंके (MLA Prakash Solanke) यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे (District Surgeon Dr. Suresh Sable) यांच्या मागणीची दखल घेत रुग्णालयातील समस्या सोडविण्यासाठी त्याचा दर्जा वाढवून उपजिल्हा रुग्णालयात करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी नागरीकांनी नागरी रुग्णालयात सुविधा उपलब्ध करुन पुर्णवेळ रुग्णालय सुरु ठेवण्याची मागणी केली.
आज मंगळवार दि.१९ रोजी येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, राष्ट्रवादीचे नेते माधव निर्मळ, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशोक डक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. साबळे यांनी जिल्ह्यात आयोजित आरोग्य मेळाव्याचे महत्त्व सांगत गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना घराघरात पोहोचवल्या जात असल्याचे सांगितले. याप्रसंगी डॉ. साबळे यांनी धारुर ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्या सोडविण्यासाठी त्याचा दर्जा वाढ करुन उपजिल्हा रुग्णालयात रुपांतरीत करण्याची गरज असल्याची मागणी केली.
यावेळी आ. प्रकाशदादा सोळंके यांनी बोलताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये (Mahatma Phule Jan Arogya Yojana) जवळ जवळ 996 रोगांवर उपचार करण्यात येतात आणि दीड लाख रुपयापर्यंत सुविधा मिळते. आयुष्यमान भारत योजनेत (Ayushyaman Bharat Yojana) 1209 रोगांवर 5 लक्ष रुपयांपर्यंत सुविधा मिळते. परंतु काही लोकांना नोंदणी न केल्यामुळे या दोन्ही योजनेचा लाभ मिळत नाही. म्हणून अनेक लोक वंचित राहतात. आरोग्य शिबिराच्या निमित्ताने दोन्ही योजनेत नाव कसे समाविष्ट करता येईल यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेत, याकरिता लागणारी माहिती आरोग्य विभागाचे कर्मचारी देतील. या दोन्ही योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळून आर्थिक मदत होईल असे आवाहन केले.
पुढे बोलताना लोकप्रतिनिधी या नात्याने ग्रामीण रुग्णालय धारूर (Dharur) येथे रुग्णांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. कोविड काळ सुरू असताना 30 लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला होता. सध्या दीड कोटी रूपयांचा निधी मंजूर करून अद्यायावत प्रसूती गृह उभारले जात आहे. धारूर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास उपस्थितांना आ. सोळंके यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आमोल जगताप, शहराध्यक्ष नितिन शिनगारे, ज्येष्ठ नेते हनुमंत नागरगोजे, उपसभापती प्रकाश कोकाटे, सय्यद हारुण मास्टर, आवेज कुरेशी, विश्वास शिनगारे, सुरेश सावंत, सटवा अंडील, बंडू मस्के, सुरेश अंडील, बाबुराव गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. मारोती लगड यांनी तर प्रास्ताविक डॉ. चेतन आदमाने केले.
( Dharur Rural Hospital will try to get the status of sub-district hospital – MLA Prakashdada Solanke. )