परिक्षेपुर्वीच 10 वी व 12 वी च्या प्रश्नपत्रिका जळाल्या; पहा कुठे घडला बर्निंग टेम्पोचा थरार…

अहमदनगर दि.23 फेब्रुवारी – संगमनेर तालुक्यातील पूणे नाशिक महामार्गावरील (Pune Nashik Highway) चंदनापुरी घाटात आज पहाटे टेम्पोला अचानक भीषण आग लागली. या आगीत टेम्पोत असलेल्या पुणे बोर्डाच्या 10 वी व 12 वीच्या हजारो प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या.
( 10th and 12th question papers were burnt before the examination; See where the tremor of burning tempo happened … )
महामार्ग पोलिसांनी (Highway Police) दिलेली माहिती अशी की, नाशिक – पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात हॉटेल साईप्रसादच्या समोर टेम्पो क्रमांक एम. पी . 36 एच. 0795 हा पुण्याकडे जात असताना पाठीमागच्या बाजूने अचानक पेटला. मागच्या बाजूने अचानक आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी सदर टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला.
चालक मनीष चौरसिया व मॅनेजर रामविलास राजपूत यांनी टेम्पो रस्त्याच्या बाजूला घेऊन आग विझविण्याचे काम सुरू केले. या अचानक लागलेल्या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ टेम्पो विझविण्यासाठी प्रयत्न चालू केले. हा टेम्पो भोपाळ (Bhopal) वरून पुण्याकडे (Pune) 10 वी व 12 वी च्या प्रश्नपत्रिका घेऊन जात होता.
घटनास्थळी घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (Police Inspector) सुनील पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख घटनास्थळी हजर होते. यावेळी भर रस्त्यावर टेम्पोला लागलेल्या आगीमुळे वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे नाशिक – पुणे वाहतूक काही काळासाठी जुन्या घाटातून चालू करण्यात आली.
संगमनेर नगर परिषद आणि संगमनेर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब (Fire brigade) घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझवली आहे. महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) भालचंद्र शिंदे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी हजर होते. या टेम्पोमधून मध्य प्रदेशातील भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या (Pune Board) प्रश्नपत्रिका नेण्यात येत असल्याचे समजले असून या सर्व प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी घटनास्थळी पोहचले.