वडवणीच्या ऊसतोड कामगाराच्या मुलावर धारुर शहरात कौतूकाचा वर्षाव; पहा काय आहे कारण…

किल्ले धारूर दि.20 एप्रिल – वडवणी (Wadwani) तालुक्यातील साळिंबा या गावातील सामान्य ऊसतोड कामगार नारायणराव नागरगोजे यांचा मुलगा गोविंद नागरगोजे याची MBBS साठी निवड झाली. यानिमित्ताने त्याचा धारुर (Dharur) शहरातील जीवन ज्ञानदीप गुरुकुलच्या वतीने सत्कार करण्यात आला.
संकल्प सामाजिक संस्था द्वारा संचलित, जीवन ज्ञानदीप गुरुकुलमध्ये नीट (NIIT) परीक्षेतील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच विद्यार्थीनी स्वागत गीत सादर करून करण्यात आली. साळिंबा येथील रहिवासी आणि ऊसतोड कामगार (sugarcane labour) असलेले नारायणराव नागरगोजे यांचा मुलगा गोविंद नारायणराव नागरगोजे याचा MBBS साठी निवड झाली आहे. यानिमित्ताने त्याचा गुरुकुलच्यावतीने सत्कार करण्यात आला आहे. गोविंद नागरगोजे याने गुरुकुलमध्ये पाचवी ते दहावी शिक्षण घेतले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन ज्ञानदीप गुरुकुलचे संचालक प्रा.रामकिसन चौरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोरांबा येथील महर्षी वाल्मिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुनील वनवे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्य दलात कमांडो म्हणून कार्यरत असलेले रघुनाथ तोंडे, अशोक मुंडे, प्रा.श्रीकृष्ण मुरकुटे, भक्तराज तोंडे, अर्जुन नागरगोजे, राहुल तोंडे, संतोष केंद्रे , मच्छिंद्र तोंडे इत्यादिंची प्रमुख उपस्थिती होती.
सत्कारमूर्ती गोविंद नागरगोजे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “जीवन ज्ञानदीप गुरुकुल ” ची स्तुती केली. अतिशय कडक, शिस्तबद्ध आणि ग्रामीण भागातील गरीब मुलांसाठी हे गुरुकुल वरदानच आहे असे सांगितले. म्हणून पालक आपल्या पाल्यांना विश्वासाने गुरुकुल मध्ये शिक्षणासाठी पाठवतात. विध्यार्थ्यांनी सतत अभ्यास केला पाहिजे, जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर आपण कितीही कठीण वाटणारे यश मिळवू शकतो. कधीही नकारात्मक विचार करू नका असेही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
राहुल तोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पाचवी ते दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम हा उद्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमांमध्ये किती महत्वपूर्ण आहे याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गुरुकुलची विद्यार्थीनी कल्याणी शेळके हिने केले तर आभार जीवन ज्ञानदीप गुरुकुलच्या संचालिका कोमल चौरे यांनी मानले.
( Doctor to be son of Wadwani sugarcane worker; A shower of appreciation in the city of Dharur. )