BEED24

दारुड्या पतीचा मध्यरात्री पोलिसांना फोन ; धारुर पोलिसांनी एकास घेतले ताब्यात.

किल्लेधारूर दि.2 अॉक्टोंबर – दारुड्या पतीचा मध्यरात्री पोलिसांना 112 नंबर डायल करून पत्नी आत्महत्या करत असल्याची खोटी माहिती दिली. पोलिसांनी सतत येणाऱ्या फोन कॉलमुळे तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता संबंधित व्यक्तीने खोटी माहिती दिल्याचे उघडकीस आले. सदर व्यक्तीला धारूर पोलिसांनी अटक केली आहे. नवनाथ तिडके असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे.

नवनाथ विठ्ठल तिडके हा धारूर (Dharur) तालुक्यातील (जि.बीड) भोगलवाडी गावात राहतो. त्याने मध्यरात्री पोलिसांना 112 नंबर वर कॉल करत माझी बायको घरातून निघून गेली आहे आणि ती आत्महत्या (suicide) करणार असल्याची माहिती दिली. एकदा नव्हे तर अनेक वेळा कॉल येत असल्यामुळे धारूर पोलिस तत्काळ भोगलवाडी गावात तिडके याच्या घरी पोहोचले. त्यावेळी नवनाथ तिडके आणि त्याची पत्नी दोघेही एकाच घरात त्यांना आढळून आले. पोलिसांनी (Police) अधिक चौकशी केल्यानंतर नवनाथ याने दारूच्या नशेत फोन केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

या सर्व प्रकरणानंतर पोलिसांनी नवनाथ तिडके यांच्याकडे याबद्दल विचारणा केली असता तो दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले. यातूनच त्याने हा प्रकार केल्याची त्याने पोलिसांकडे कबुली दिली. पोलिस अंमलदार संतोष बहिरवाडी यांच्या फिर्यादीवरून नवनाथ विठ्ठल तिडके याच्यावर बनावट कॉल (fake call) केल्याप्रकरणी धारूरच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आज धारूर पोलिसांनी त्याला अटक केली. संकट काळात नागरिकांना तात्काळ पोलिसांची मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडून 112 नंबरची हेल्पलाइन (Helpline) जारी करण्यात आली आहे. परंतु, या नंबरवर फोन करून खोटी माहिती सांगणे, टिंगल करणे असे अनेक प्रकार समोर येत आहेत.
( Drunk husband calls the police in the middle of the night; Dharur police took one into custody. )

Exit mobile version