उपोषण, आंदोलन करा आणि आपली समस्या सोडवा… धारुर नगर परिषदेची अशीही कार्यतत्परता…

किल्लेधारूर दि.१८(वार्ताहर) येथील नगर परिषद कार्यालयासमोर आज शहरातील झारे गल्ली भागातील २५ ते ३० घरांच्या पाणी पुरवठा सुरळीत करण्यासह इतर मागण्यासाठी नगरसेवक संजित कोमटवार यांनी उपोषण केले. आज सकाळी ११ वाजता कोमटवार व इतरांनी उपोषण सुरु केले तसे त्यांची दखल घेत काम सुरु करण्याची तत्परता पालिका प्रशासनाने दाखवली. यापुर्वीही असाच अनुभव आल्याने आता आपल्या समस्या सोडविण्यासाठी उपोषण किंवा आंदोलनच करावे लागणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
धारूर शहरातील झारेगल्ली भागात गेल्या दहा वर्षा पासून पंचेवीस ते तिस घरांचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक वेळा नगर परिषद प्रशासनाकडे मागणी करून हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे नगरसेवक संजित कोमटवार यांनी तक्रार केली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही नगर परिषदेने केराची टोपली दाखवली. त्यामुळे याभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संजित कोमटवार हे नागरिकांसह नगर परिषद कार्यालया समोर गुरूवार दि.१८ रोजी आमरण उपोषणास बसले. त्यांचे उपोषण सुरु होताच नगर परिषदेने कामास सुरुवात केली. यापुर्वीही एआयएमआयएम, शिवसेना व डोंगरवेस येथील नागरिकांच्या उपोषण व मोर्चा प्रसंगी असाच अनुभव आल्याने नागरिकांत चर्चेस उधान आले आहे. याबाबत मुख्याधिकारी नितिन बागुल यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट नकार देत काही तांत्रिक अडचणी मुळे विलंब लागल्याचे सांगत यापुढे काळजी घेतली जाईल असे सांगितले.
दुपारी २ वाजता मुख्याधिकारी नितिन बागुल यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून सर्व उर्वरित कामे दि.२४ फेब्रुवारी पर्यंत पुर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. नगरसेवक संजीत कोमटवार सह या भागातील नागरीक सय्यद रज्जाक, सय्यद कासम, सलिम शहा, चाँद शाह, इरशाद आब्बास मोमीन आदीनी उपोषण सोडले. यावेळी माजी नगराध्यक्ष माधवराव निर्मळ, जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेरअली, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन शिनगारे, युवानेते सुधीर शिनगारे, शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब कुरुंद, प्रदिप नेहरकर, सय्यद हारुण, मुजाहेद मोमीन, आमोल शेळके, दत्तात्रय गोंदणे, प्रा. राम लोखंडे आदींची उपस्थिती होती.