खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वादग्रस्त विधान भोवले.

बाराबंकी दि.10 सप्टेंबर – ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (MP Asaduddin Owaisi) यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कार्यक्रमात भाषण करत असताना प्रक्षोभक विधाने केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(Filed a case against MP Asaduddin Owaisi; Controversial statement surrounds.)
गुरुवारी बाराबंकी येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याला ओवेसी हे उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान केलेल्या भाषणात ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर टीका केली होती. ओवेसी यांनी आरोप केला आहे की रामसनेही घाटावर असलेली 100 वर्ष जुनी मशीद प्रशासनाने तोडून टाकली.
पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना ओवेसी म्हणाले की देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील धर्मनिरपेक्षता नष्ट करण्याचे आणि देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं ओवेसी यांचं म्हणणं आहे. या भाषणात ओवेसींनी केलेल्या वादग्रस्त आणि प्रक्षोभक विधानांमुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओवेसी यांनी उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी निवडणुका (elections) लढवण्याचं जाहीर केलं आहे. त्यांचा पक्ष इथल्या 100 जागांवर आपले उमेदवार देणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी उत्तर प्रदेशचा दौरा केला. 3 दिवस ते उत्तर प्रदेशात होते आणि त्यांनी रुदौली येथे सभा देखील घेतली होती. गुरुवारी बाराबंकी येथे होणाऱ्या कार्यक्रमाला सुरुवातीला प्रशासनाने परवानगी नाकारली होती, मात्र कोरोनाच्या नियमांचे (Corona guidelines) पालन करण्याच्या अटीवर कार्यक्रमाला नंतर परवानगी देण्यात आली होती. या कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांचे पालनही करण्यात आले नव्हते, ज्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती.