धारुरात कोरोना बाधितावर नगर परिषदेकडून अंत्यसंस्कार; रुग्णालयातील पहिलाच मृत्यू.

किल्लेधारूर दि.14 मे- कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग चांगलाच वाढला असून पुणे, अहमदनगर, औरंगाबाद व नांदेडनंतर बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) पावणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. आज धारुर तालुक्यातील चोरांबा येथील 25 वर्षीय कोरोना बाधित युवकावर येथील सार्वजनिक स्मशानभुमीत नगर परिषदेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.
(Funeral by Municipal Council on Corona Obsession in Dharur; The first death in the hospital.)
येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल चोरांबा येथील युवकावर उपचार सुरु असताना निधन झाले. दोन दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यास गुरुवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र यातच त्याचे निधन झाले. त्याची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आली. अशी माहिती रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. चेतन आदमाने यांनी दिली.
त्याची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आल्याने नगर परिषदेकडून (Dharur Municipal Council) येथील वैकूंठधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितिन बागुल, अधिक्षक नितिन इजाते, सचिन डावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी केशव नाईकवाडे, भागवत डोहिफोडे, सुंदर लोखंडे, महेंद्र सिरसाट, विश्वास जाधव, गेना शिंदे मुना ठाकुर आदीनी अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडली.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर टाकणारी ठरत आहे. बीड जिल्ह्यातही दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून दररोजचा आकडा हजाराच्या पुढे गेला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग वाढला आहे. विशेष करुन ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा वाढलेला संसर्ग प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. वाढलेली रुग्ण संख्येसह मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
धारुर तालुक्यातही मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजपर्यंत तालुक्यात 53 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात तालुक्यात 6 मृत्यूची (Corona Death) नोंद झाली होती. मृतात 49 वर्षीय पुरुष, व्हरकटवाडी, 70 वर्षीय पुरुष, देवदहिफळ, 50 वर्षीय पुरुष, सोनिमोहा, 60 वर्षीय पुरुष मैंदवाडी, 65 वर्षीय पुरुष चाटगाव, 70 वर्षीय पुरुष, धारुर यांचा समावेश आहे.
तालुक्यातील बहुतेक कोरोना बाधित मृत्यू (Corona Death) हे अंबाजोगाई येथे झालेले आहेत. उपचार सुरु असताना येथील ग्रामीण रुग्णालयात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. यापुर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर जीव वाचवण्यासाठी आलेल्या एका रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. तर काही दिवसांपुर्वी एका कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाला होता. या तिन्ही मृतांवर धारुर नगर परिषदेच्या (Dharur Municipal Council) कर्मचाऱ्यांनी कोविड नियम पाळत पीपीई किटधारण करुन अंत्यसंस्कार केले.