धनंजय मुंडे धारुर न्यायालयात……

किल्लेधारूर दि.२८(वार्ताहर) येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात आज एका प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे (Beed) पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) न्यायालयासमोर स्वतःहून हजर झाल्याचे पहायला मिळाले. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रकरणात स्वतः निर्णय व न्याय देण्याचा अधिकार असलेला असामान्य व्यक्ती आज सामान्य आरोपीच्या रुपात न्यायालयाचा सम्मान राखत असतानाचा अनुभव आला.
न्याय व्यवस्था हि अतिसामान्य ते असामान्य व्यक्तीसांठी सारखीच असते. न्यायालयात दाद मागण्याचा सर्वांचा अधिकार सारखाच. प्रकरण राजकीय असो की अराजकीय सर्व आरोपी न्यायालयाचा आदर राखत न्यायाची अपेक्षा करतात. आज न्यायालयात राज्याचे सार्वजनिक न्याय मंत्री तथा बीड (Beed) जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे एका राजकीय प्रकरणातील आरोपी म्हणून उपस्थित होते. दिंद्रुड पोलिस ठाणे अंतर्गत तेलगाव येथे झालेल्या एका विजयी मिरवणूकीतील वादानंतर तत्कालीन पोलिस निरिक्षक दिपक पवार यांनी फिर्याद देवून २४ आरोपी विरुध्द शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सन २००६ मध्ये नोंदवला होता. २००९ पासून आरोप निश्चिती नंतर सदरील प्रकरण न्याय प्रविष्ठ होते. सर्वोच्च न्यायालयाच्या खासदार, आमदार यांच्या वरील खटले वर्षभरात निकाली काढण्याच्या निर्देशानुसार पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आज स्वतःहून न्यायालयात हजर झाले. मंत्री झाल्यानंतर प्रथमच धनंजय मुंडे न्यायालयात उपस्थित झाल्याने याला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. न्यायप्रविष्ठ प्रकरणास आज पासून गती येवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वर्षभरात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या वतीने या खटल्याचे काम विधिज्ञ ॲड.जे.बी. बडे पाहत आहेत. यावेळी न्यायालय परिसरात धनंजय मुंडे यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.