धारुर प्रिमियम लिगचा आज अंतिम सामना…
सिनियर फायटर व मैत्री संघ आमनेसामने

किल्लेधारूर दि.६(वार्ताहर) शहरात खेळवल्या जात असलेल्या धारुर प्रिमियम लिग (DPL) क्रिकेट स्पर्धेचा आज अंतिम सामना सिनियर फायटर व मैत्री क्रिकेट (Cricket) संघात दुपारी बारा वाजता चिरका मैदानात होत आहे. गेल्या दिवसांपासून सुरु असलेल्या डिपीएल स्पर्धेस प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
शहरात गेली आठ वर्ष धारुर प्रिमियम लिग (DPL) या स्पर्धा जयहिंद क्रिकेट क्लबकडून खेळविल्या जातात. अगदी आंतरराष्ट्रीय इंडियन प्रिमियम लिगच्या धर्तीवर या स्पर्धा होतात. तालुक्यातील क्रिकेट (Cricket) खेळाडूंना यात संधी देवून लिलाव पध्दतीने खेळाडू निवडले जातात. यावर्षी या स्पर्धेत शिवशक्ती वॉरिअर्स, सिनियर फायटर, बागवान वॉरिअर्स, जय मल्हार फायटर्स, मैत्री क्रिकेट, जय हनुमान क्रिकेट क्लब, युवा भारत व योध्दा भाई क्रिकेट क्लब या आठ संघांना संधी देण्यात आली. या संघात लिग सामन्यानंतर उपांत्य व अंतिम सामना खेळले जातात. यावर्षी दि.२६ रोजी प्रजासत्ताक दिनी या स्पर्धेचे उद्घाटन होवुन काल दि.५ शुक्रवारी योध्दा भाई विरुध्द सिनियर फायटर तर दुसरा युवा भारत विरुध्द मैत्री यांच्यात उपांत्य सामने खेळवण्यात आले. उपांत्य सामन्यात सिनियर फायटर व मैत्री संघाने विजय मिळवला. या स्पर्धेतील अंतिम सामना आज दुपारी १२ वाजता सिनियर फायटर व मैत्री संघात होत आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३१ हजार रुपये रोख महालक्ष्मी स्टोन क्रेशरचे संतोष सद्दीवाल तर द्वितीय पारितोषिक २१ हजार रुपये राजमुद्रा संघटनेचे सुरेश शेळके यांच्या वतीने देण्यात येणार आहे. याशिवाय वैयक्तिक स्वरुपाचे अनेक पारितोषिक देवून मैदानात बक्षीस वितरण सामना संपल्यावर होणार असल्याचे संयोजकांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. प्रतिवर्षी क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरणाऱ्या या स्पर्धेचा आज समारोप होत असून गेली दहा दिवस प्रेक्षकांना उदंड प्रतिसाद दिला.