
किल्लेधारूर दि.15 सप्टेंबर – Heavy Rain again धारूर तालुक्यात सोमवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाने लावलेल्या हजेरीमुळे सर्वच नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. पाझर तलाव व मोठे तलावही ओसंडून वाहत असताना आसपासच्या नदीपात्रातील शेतीतही तळे झाले असून शेतीतील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. निमला येथे गावाशेजारील एक शेड वाहून गेल्याने नऊ ते दहा शेळ्या एका शेतकऱ्याच्या वाहून गेल्या आहेत. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
तालुक्यात सोमवारी सकाळी पहाटेच पावसाने जोरदार हजेरी लावली. या हजेरीने मुख्य मार्ग बंद पडले होते व तालुक्याचा संपर्कही अनेक गावांचा तुटला होता. आसरडोह मोहखेड रस्त्यावरील जुना पूल, सोनीमोहा येथील पूल, चोरंबा चारदरी रस्त्यावरील पूल, धारूर रुई धारूर रस्त्यावरील पूल, धारूर आडस रस्त्यावरील आवरगाव जवळील पूल हे तुडुंब भरून वाहत असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. हे पूल पूर्णपणे खचून गेले असल्याने या मार्गावर वाहन चालवणेही आता मुश्किल झाले आहे. या पावसाने कहर केल्याने शेतीमध्येही तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने शेतीतील सोयाबीन कापूस व इतर पिके पूर्णपणे हातची गेली आहेत. तालुक्यातील डोंगरी रस्तेही पूर्णपणे पाण्याने खचून गेले असून आता नागरिकांना जाणे येणे ही मुश्किल झाले आहे. या परिस्थितीने या पावसाने मात्र चांगलाच कहर माजवला आहे. तालुक्यातील निमला येथील रेशीम केरबा नरोटे यांचे गावा शेजारीत घरामागे पत्राच्या शेडमध्ये शेळ्यांसाठी पञ्याचा कोठा होता त्या ठिकाणच्या दहा शेळ्या ही पुराच्या पाण्याने सकाळी वाहून गेल्याची घटना घडली आहे. तालुक्यात ही इतर ठिकाणी शेतकऱ्याचे मोठे नुकसान या पावसाने झाल्याने तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे. रस्ते व पुल व रस्त्याची दुरुस्त्याही तात्काळ कराव्यात अशीही मागणी नागरिकांतून होत आहे.



