खाजगी बस आणि क्रुझर जीपचा भीषण अपघात; एक ठार 8 गंभीर जखमी.

जालना दि.13 जून – आज रविवारी पहाटेच्या सुमारास जालना येथील एका खाजगी बस (Private bus) आणि क्रुझर जीपचा अंबड टी पॉईंटवर भीषण अपघात (Horrific Accident) झाला. या अपघातात एक प्रवासी महिला जागीच ठार झाली, तर इतर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती कळताच पोलिस (Police) घटनास्थळी पोहोचले. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
(Horrific accident of private bus and cruiser jeep; One killed 8 seriously injured.)
स्वाती अजय काळे (30) असे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील चांदस ता. माढा येथील 9 प्रवासी क्रुझर जीपने रामनगर साखर कारखाना येथे लग्न सोहळ्यासाठी जात होते. त्यांच्या जीपला विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातून मुंबईकडे 35 प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसने अंबड चौफाळ्यावर जोरदार धडक दिली.
हा अपघात (Accident) एवढा भीषण होता, की जीप रस्त्याच्या कडेला तीन वेळा पलटी खात कोसळली. तसेच, खाजगी बसचा (Private bus) समोरच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. खाजगी बसचे ही या अपघातात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने बस मधील एकही प्रवाशी जखमी झालेला नाही.
जीपमधील जखमीवर संजीवनी हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती कळताच कदीम जालना पोलीस (Police) ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टाक यांच्यासह पोलीस कर्मचारी दीपक दाभाडे, राजू साळवे, उमेश साबळे, गजानन काकडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी जखमींना मदत केली.
या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे:
धोंडीराम रामराव तांबवे (42), सागर अरविंद शेंडगे (27), आनंद उत्तम काळे (21), प्रियांका सागर शेंडगे (22), सविता धोंडीराम तांबवे (35), सार्थक अजय काळे (8), राजवीर सागर शेंडगे (5), राजनंदिनी सागर शेंडगे (3).